श्रीवर्धनमधील दामिनी पथक अडचणीत
esakal September 15, 2025 05:45 AM

श्रीवर्धनमधील दामिनी पथक अडचणीत
महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन; वाहन नसल्याने खासगीवर अवलंबून
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारतर्फे दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे, मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील श्रीवर्धन पोलिस ठाण्यातील दामिनी पथक सध्या दुचाकीअभावी अडचणीत सापडले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१५ मध्ये पथकाला उपलब्ध करून देण्यात आलेली दुचाकी आज बंद अवस्थेत असून, अंमलदारांना गस्तीसाठी खासगी दुचाकींचा आधार घ्यावा लागत आहे.
शाळा, महाविद्यालय, बसस्थानक अशा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मुलींना होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी दामिनी पथक अत्यंत महत्त्वाचे ठरते. महिलांना सुरक्षितपणे समाजात वावरता यावे, आत्मविश्वास वाढावा आणि अत्याचारास प्रतिबंध घालावा, या उद्देशाने २०१५ मध्ये श्रीवर्धन पोलिस ठाण्यात या पथकाची स्थापना झाली. सुरुवातीला दुचाकी मिळाल्यामुळे पथकाच्या कामकाजाला गती आली होती आणि विद्यार्थिनी, महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. पथकाची कामगिरी मुख्यत्वे दोन टप्प्यांत पार पडते. पहिला टप्पा म्हणजे पोलिस गणवेशात शहरात गस्त घालणे तर दुसरा टप्पा म्हणजे पोलिस ठाण्याच्या विस्तीर्ण हद्दीत दुचाकीवरून गस्त ठेवणे, मात्र वाहन बंद पडल्याने या दोन्ही कार्यपद्धतींवर परिणाम झाला आहे.
.....................
श्रीवर्धन पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४८ गावांचा समावेश असून, क्षेत्रफळ ६२८.३४ चौरस किलोमीटर आहे. या मोठ्या क्षेत्रात सुमारे ४६,९३९ लोकसंख्या वास्तव्यास आहे, त्यापैकी जवळपास २२,१४३ महिलांची संख्या आहे. या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या काही महिला अंमलदारांवर असून, त्यांच्याकडे योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पथकाची कार्यक्षमता मर्यादा येत आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या या पथकाला अद्याप नवीन दुचाकी न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थिनी आणि महिला सुरक्षेसाठी हे पथक गस्त घालत असताना खासगी दुचाकी वापरण्याची वेळ आल्याने पोलिस प्रशासनावरील विश्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
.................
यासंदर्भात श्रीवर्धन पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील म्हणाले, दामिनी पथकासाठी नवीन दुचाकी मिळावी, यासाठी वाहतूक नियंत्रक अधिकारी, अलिबाग यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे. लवकरच सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अपेक्षा आहे. एकंदरीत, महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन झालेले दामिनी पथकच योग्य सुविधेच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव समोर येत आहे. शासन व पोलिस विभागाने तातडीने यावर लक्ष घालून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले हे पथक खऱ्या अर्थाने प्रभावी ठरेल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.