भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागेल. कारण भारतीय संघाने 50 षटकात 7 गडी गमवून 281 धावा केल्या आणि विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान भारतीय गोलंदाज रोखतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 गडी गमवून 44.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात भारताची गोलंदाजी पूर्णपणे फेल गेली. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची भारताची तयारीचा अंदाज यावेळी क्रीडाप्रेमी बांधत आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होत आहे आणि अशा सुमार गोलंदाजीमुळे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं की, ‘आम्हाला फलंदाजीमध्ये 20-30 धावा कमी पडल्या होत्या, आमच्या गोलंदाजांनी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आम्ही त्या संधींचा फायदा घेऊ शकलो नाही. त्यांनी खरोखर चांगले क्रिकेट खेळले. पण पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि आम्हाला सकारात्मक राहायचे आहे, त्याची वाट पाहत आहोत. दोन्ही डावात खेळपट्टी चांगली खेळली, पण काही सकारात्मक फलंदाजी आणि २०-३० धावा जोडून संधी घेतल्याने मोठा फरक पडला असता. पुढच्या सामन्यापूर्वी आम्ही खेळपट्टीचा विचार करू आणि त्याचे विश्लेषण करू. आमच्याकडे जे काही आहे त्याचा वापर करून आम्ही प्रयत्न करू, ते आमचे सर्वोत्तम संयोजन होते.‘
भारताकडून प्रतीका रावल आणि स्मृती मंधाना यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 114 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना 58 धावा करून बाद झाली. त्यानंतर 142 धावा असताना प्रतीका रावल 64 धावांवर तंबूत परतली. त्यानंतर हरलीन देओलने मोर्चा सांभाळला. तिने 57 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्स 18, हरमनप्रीत कौर 11, रिचा घोष 25, राधा यादव 19 धावा करून बाद झाले. तर दीप्ती शर्मा नाबाद 20 आणि श्री चरणी नाबाद 2 धावांवर राहिले.
टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं आव्हान फक्त दोन गमवून ऑस्ट्रेलियाने पूर्ण केलं. एलीसा हिली 27 धावा करून बाद झाली. पण फोबी लिचफिल्ड, एलिस पेरीने डाव सावरला. पण एलिस पेरी 30 धावांवर रिटायर्ड हर्ट झाली. त्यानंतर बेथ मुनीने आक्रमक खेळी केली . तिने 74 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या.