मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा कालपासून तालुक्यात ढगाळ वातारण असल्यामुळे पावसाची संततधार सुरू असल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले तर मजुरीवर काम करणाऱ्यांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. यंदाचे वर्ष शेतकऱ्याच्या दृष्टीने नैसर्गिक आपत्तीचे ठरू लागले.
दोन दिवसात ढगाळ वातावरणासह संततदार पावसाची हजेरी तर आज सायंकाळच्या सत्रात दमदार पावसाची हजेरी लागली तालुक्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये बाजरी, तुर,मका, कांदा, सूर्यफूल, उडीद या पिकाची पेरणी केली असून यंदा मक्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर बाजरीच्या क्षेत्रात घट झाली. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी उडीद पिकाची पेरणी केली परंतु उडीदाला पावसाचा दणका बसल्याने अपेक्षित दर नसल्यामुळे उडीद केलेल्या शेतकऱ्यांना केलेल्या खर्चा इतके उत्पन्न मिळाले नाही.
सध्या काही शेतकऱ्यांच्या काढणी केलेल्या पिकाची मोडणी पावसामुळे करता येईना. कांदा पिकाचे देखील नुकसान झाले. यंदा मका पिकावर रोगराईचे प्रमाण कमी आहे गत पंधरवड्यामध्ये उजनी व निरेच्या लाभक्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या पिकाचे नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. विमा कंपनीने पीक विम्याच्या भरपाईचे निकष बदलल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्यापासून दूर गेले.
सततच्या पावसामुळे झालेल्या सर्व गावातील नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे यंदा मान्सून पाऊस लवकर झाल्यामुळे उन्हाळ्यातच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी हंगामातील पिके व फळ पिकाचे नुकसान झाले मात्र नुकसान भरपाई फक्त 40 शेतकऱ्यांना मिळाले गट पंधरवड्यामध्ये तालुक्याच्या नदीपट्ट्यात झालेल्यापुराच्या पाण्याने नदीकाठच्या 9 गावातील 156 शेतकऱ्याचे 102 हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे केले मात्र तालुक्याच्या सर्वच भागात सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले.
मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीचे व पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे केले मात्र तालुक्याच्या इतर भागात देखील सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा भरले नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची आवश्यकता आहे.
अजित जगताप, मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी
सततचा पाऊस व ढगाळ वातावरणाने डाळिंबावर कुज आणि तेलकट रोगाबरोबर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे,वरील बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांपासून आपली पिके शेतकऱ्यांनी वाचविण्यासाठी बाह्य स्पर्शी बुरशीनाशकांचा वापर करावा, तसेच पाऊस थांबल्यावर शाडोफाईट आणि कंबास व जैविक बुरशीनाशक याचा वापर केल्यास बुरशी आणि जीवाणूजन्य रोग आटोक्यात येतील.
अजय आदाटे, कृषीतज्ञ ॲग्रीक्रॉस एक्सपोर्टस
सलग दोन दिवस आलेल्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान तर झाले आहे डाळिंबी पिकाचा भर धरला आहे मात्र कुजवा आणि तेलकट रोगाच्या भीतीने गेल्या दोन दिवस सातत्याने फवारणी करावी लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. सततच्या पावसाने फुल गळतीचा फटका बसला.
विठ्ठल माने, डाळिंब उत्पादक शेतकरी भाळवणी