50 हजार पगार असल्यास 2 कोटींचा फंड कसा तयार करायचा? ‘हा’ फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर, जाणून घ्या
Marathi September 15, 2025 07:25 PM

मुंबई : तुमचा सध्याचा एका महिन्याचा पगार 50000 रुपये असेल आणि तुम्हाला 2 कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर ते तुमच्यासाठी योग्य आर्थिक नियोजन केल्यास शक्य आहे. योग्यप्रकारे बजेट प्लॅनिंग आणि गुंतवणूक केल्यास हे शक्य होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या पगाराच्या हिशोबानं समजूतदारपणे खर्च करावा लागेल आणि ठराविक रकमेची गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला 50-30-10-10 फॉर्म्युला फायदेशीर ठरेल.

50-30-10-10 फॉर्म्युला नेमका काय?

खर्च आणि गुंतवणुकीचं नियोजन करण्यासाठी हा नियम फॉलो करावा लागेल. हा नियम तुमच्या पगाराचं चार भागात विभाजन करण्याचा सल्ला देतो. ज्यामध्ये आवश्यक गोष्टी, बचत, गुंतवणूक आणि छंद जोपासण्यासाठी योग्य प्रकारे खर्च करता येऊ शकेल. जर तुमचा पगार 50000 रुपये असेल तर या नियमानुसार 50 टक्के रक्कम म्हणजे 25000 रुपये आवश्यक खर्चासाठी वापरता येतील. यामध्ये घरभाडे, वीज आणि पाण्याचं बिल, मुलांचं शिक्षण, किचनमधील साहित्य, ट्रान्सपोर्ट आणि ईएमआय या सारखे खर्च येतात.

यानंतर 30 टक्के म्हणजे 15 हजार रुपये छंद जोपासणे आणि लाइफस्टाइलवर खर्च करता येतील. ज्यामध्ये फिरायला जाणं, चित्रपट पाहणं, ऑनलाईन शॉपिंग करणं, हॉटेलमध्ये जेवायला जाणं या गोष्टी करता येतील.हा खर्च तुमचं आयुष्य संतुलीत ठेवण्यात मदत करतो.

पगारातील तिसरा म्हणजेच 10 टक्के रक्कम म्हणजे 5000 हजार रुपये गुंतवणुकीसाठी असतील. याचा अर्थ तुम्ही अशा ठिकाणी पैसे लावा, जो तुमच्यासाठी काम करेल. यामध्ये म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट, गोल्ड पीपीएफ यासारखे पर्याय निवडू शकता.

चौथा आणि अखेरचा भाग 10 टक्के म्हणजे 5000 रुपये जे आपत्कालीन फंड आणि विम्यासाठी ठेवावेत. वैद्यकीय अडचण अचानक आल्यास या फंडातील रक्कम तुम्ही वापरु शकता. ज्यामुळं तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार नाही.

2 कोटी रुपयांचा फंड कसा तयार करायचा?

50 हजार रुपये पगार असल्यास 2 कोटींचा फंड कसा तयार करायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र, योग्य नियोजन आणि शिस्तबद्धपणे गुंतवणूक करावी लागेल. दरमहा 5000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा, वार्षिक 12 टक्के सीएजीआर मिळाला तर  31 वर्षात 2 कोटींचा फंड तयार होईल. 31 वर्ष हा कालावधी अधिक असेल तर तुम्ही दरमहा 5000 रुपयांनी गुंतवणुकीला सुरुवात केल्यास आणि 10 टक्के स्टेप अप केल्यास वार्षिक 12 टक्के सीएजीआरनं  25 वर्षात 2 कोटी रुपयांचा फंड तयार होईल.

पगार ज्या प्रमाणं वाढेल त्याप्रमाणं दरवर्षी गुंतवणूक वाढवली पाहिजे. यामुळं पैसे वेगानं वाढतील आणि 2 कोटी रुपयांचा फंड लवकर तयार होईल. गुंतवणूक दीर्घकाळ करणं आवश्यक आहे. मध्येच पैसे काढल्यानं किंवा एसआयपी थांबवल्यानं तुमच्या फंडात मोठी रक्कम जमा होऊ शकणार नाही. जर तुम्हाला कमी कालावधीत 2 कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर  खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि गुंतवणूक वाढवावी लागेल. जर तुमच्या पगाराच्या 20 टक्के रकमेची गुंतवणूक केली आणि मिळालेला बोनस देखील खर्च करण्याऐवजी गुंतवणुकीसाठी वापरला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.