नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस विभागानं आयटीआर फाईल करण्यासाठी दिलेली तारीख 15 सप्टेंबर म्हणजेच आज संपणार आहे. शेवटचा दिवस असल्यानं करदाते मोठ्या प्रमाणात आयटीआर फाईल करत असल्यानं इन्कम टॅक्स विभागाची आयटीआर फायलिंगच्या वेबसाईटचा वेग मंदावला आहे.
इन्कम टॅक्स विभागानं आयटीआर फॉर्म आणि टीडीएस रिफ्लेक्शनसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी दुरुस्त्या केल्या होत्या. त्यामुळं यंदा 31 जुलैवरुन मुदत वाढवून 15 सप्टेंबर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून आयटीआर फाईल करणाऱ्या अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. लॉगीन फेल होणे, ॲकनॉलेजमेंट विलंबानं मिळणे किंवा एरर मेसेज येणे, असे प्रकार घडत होते. आज आयटीआर फाईल करण्याच्या शेवटच्या दिवशी लॉगीन पेज लोड होण्यात उशीर होत असल्याचं निर्दशनास आलं.
गेल्या वर्षी 31 जुलै 2024 पर्यंत 7.28 कोटी करदात्यांनी आयटीआर फाईल केले होते. 13 सप्टेंबरला आयकर विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार 6 कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केला होता. आयटीआर फाईल करण्यास 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिल्यानं यंदा आयटीआर फाईल करणाऱ्यांची संख्या वाढेल, असं अपेक्षित होतं. आयकर विभागानं दिलेल्या वेळेनंतर आयटीआर फाईल करण्यासाठी दंड भरावा लागतो. ज्या करदात्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 1000 रुपये दंड द्यावा लागतो. तर, 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना 5000 रुपये दंड द्यावा लागतो.
इन्कम टॅक्स विभागानं आज सकाळी एक पोस्ट केली आहे. ज्यामुळं आर्थिक वर्ष 2024-25 म्हणजेच असेसमेंट इयर 2025-26 साठी आयटीआर भरण्याची तारीख 15 सप्टेंबर असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुदतवाढ मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय इन्कम टॅक्स विभागानं आयटीआर फायलिंग मुदतवाढीसंदर्भातील पोस्ट फेक असल्याचं देखील सांगितलं आहे.
नॉन ऑडिटेड करदात्यांना आजचं आयटीआर फाईल करावा लागेल. इन्कम टॅक्स विभागानं यापूर्वी आयटीआर फायलिंगची मुदत 31 जुलै 2025 वरुन 15 सप्टेंबर 2025 केली होती.
आयटीआर फाईल करण्याची इच्छा असून वेबसाईटला समस्या असल्यानं आयटीआर भरता येत नाही, अशा तक्रारी करदात्यांकडून करण्यात येत आहेत. जे करदाते शेवटच्या तारखेपर्यंत थांबले त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. इन्कम टॅक्स विभागानं मुदतवाढ न केल्यासं दंड द्यावा लागू शकतो.
आणखी वाचा