दिल्ली हायकोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या पर्सनालिटी राईट्सचं (व्यक्तिमत्त्व अधिकार) संरक्षण करत अंतरिम आदेश दिले आहेत.
कोर्टानं म्हटलं की, परवानगशिवाय कोणत्याही सेलिब्रिटीच्या ओळखीचा (नाव, फोटो, आवाज इत्यादी) वापर त्या सेलिब्रिटीच्या आर्थिक हित आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचवू शकतो.
हायकोर्टाने एका वेगळ्या प्रकरणामध्ये ऐश्वर्याचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांच्याही व्यक्तिमत्त्व अधिकारांचं संरक्षण करत त्यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला आहे.
या आदेशानुसार, हायकोर्टाने अनेक संस्थांना त्यांची नावे, फोटो आणि आवाजांचा चुकीचा वापर करण्यापासून रोखलेलं आहे.
न्यायाधीश तेजस करिया यांनी 9 सप्टेंबर रोजी ऐश्वर्या रायच्या या प्रकरणाबाबत अंतरिम आदेश देत म्हटलं की, जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची ओळख त्याच्या परवानगीशिवाय वापरली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान होऊ शकतं.
तसेच, त्या व्यक्तीच्या सन्मानासहित जगण्याच्या अधिकारांवरही बाधा येऊ शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?हे प्रकरण ऐश्वर्या राय बच्चनच्या याचिकेशी संबंधित आहे. त्यात तिने तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंच्या गैरवापरावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
तिच्या म्हणण्यानुसार, अनेक वेबसाईट्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तिच्या परवानगीशिवाय तिचं नाव, फोटो, आवाज, इतकंच नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या अश्लिल कंटेटचाही सर्रास वापर करत आहे.
ऐश्वर्याकडून असं सांगण्यात आलं की, या अशा गोष्टींमुळे केवळ तिच्या ब्रँड व्हॅल्यू आणि उत्पन्नावर परिणाम होत नाही तर तिची प्रतिमा आणि प्रतिष्ठेवरही विपरित परिणाम होत आहे.
ऐश्वर्या रायने न्यायालयाला विनंती केली की, तिचं नाव किंवा फोटो वापरणाऱ्या सर्व वेबसाइट्स, प्लॅटफॉर्म आणि व्यक्तींना रोखण्यात यावं.
तिच्या याचिकेत असं म्हटलंय की, काही वेबसाइट्स परवानगीशिवाय ऐश्वर्याच्या फोटोचा वापर करुन आपली उत्पादनं विकत आहेत.
याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, एक संस्था, एक एआय चॅटबॉट वेबसाइट आणि काही युट्यूब चॅनेल्सदेखील तिच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करत आहेत.
ऐश्वर्याने तिच्या याचिकेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, दूरसंचार विभाग आणि गुगल यांनाही पक्षकार बनवलं आहे.
न्यायालयानं ऐश्वर्या रायची तक्रार गांभीर्यानं घेतली आहे, तसंच खटला तिच्या बाजूने निकाली काढला आहे. अशा गैरवापरावर अंतरिम स्थगितीचा आदेशही दिला आहे.
उच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, आता कोणतीही व्यक्ती किंवा संस्था परवानगीशिवाय ऐश्वर्या राय बच्चनचं नाव किंवा तिच्या नावाचं संक्षिप्त रूप 'एआरबी', तिचा फोटो, आवाज किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर कोणताही पैलूचा वापर करू शकणार नाही.
ही बंदी सर्व प्रकारच्या स्वरूपातील माध्यमांना लागू असेल, मग ती पारंपरिक असो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग, डीपफेक किंवा फेस मॉर्फिंग अशा नव्या तंत्रज्ञानील माध्यमांनाही ही बंदी लागू असेल.
आदेशात काय म्हटलंय?दिल्ली उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशात म्हटलं आहे की, ऐश्वर्या रायसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तित्व हक्क पूर्णपणे संरक्षित आहेत आणि तिच्या नावाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करता येणार नाही.
तसेच, तिच्या नावाचा किंवा प्रतिमेचा वापर करून कोणतंही उत्पादन विकता येणार नाही. परवानगीशिवाय तिच्या नावानं उत्पादने विकणाऱ्यांनाही असं करण्यास मनाई करण्यात आली आहे.
न्यायालयानं मान्य केलं की, ऐश्वर्या ही केवळ भारतातच नाही तर जगभरात एक प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आहे. तिने तिच्या कामातून एक विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
तिचं नाव, फोटो, आवाज आणि शैली यांना मोठं व्यावसायिक मूल्य आहे. त्यामुळे, परवानगीशिवाय या गोष्टींचा वापर करणं हे जनतेची दिशाभूल करणारं ठरेल.
न्यायालयानं सर्व प्रतिवादींना (ज्या संस्था किंवा व्यक्तींविरुद्ध याचिका आहे) समन्स जारी केले आहेत आणि त्यांना त्यांचे लेखी उत्तर एका महिन्याच्या आत दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, खटल्याची पुढील सुनावणी 15 जानेवारी 2026 रोजी निश्चित केली आहे.
यासोबतच, गुगललाही असा आदेश देण्यात आला आहे की, याचिकेत नमूद केलेल्या ऐश्वर्याशी संबंधित यूआरएल तत्काळ काढून टाकण्याचे किंवा ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, त्या वेबसाइट्स किंवा अकाऊंट्सच्या मालकांची सबस्क्राइबर माहिती सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात, 'व्यक्तिमत्व हक्क' आणि 'प्रसिद्धी हक्क' हे दोन्ही शब्द वापरले गेले आहेत. हे दोन्हीही हक्क प्रत्यक्षात एकाच प्रकारच्या अधिकारांशी संबंधित आहेत.
यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, फोटो, हस्ताक्षर, आवाज आणि एकंदरीत असणं (खास शैली, हावभाव) यांचा समावेश होतो. या गोष्टींवर फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीचा अधिकार असतो.
याचा सरळ अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तीला त्याचं नाव, प्रतिमा आणि ओळख यांचा व्यावसायिक वापर नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. परवानगीशिवाय इतर कुणीही त्यांचा वापर करू शकत नाही आणि त्यातून नफाही कमवू शकत नाही.
हा अधिकार विशेषतः सेलिब्रिटींसाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण, त्यांची नावे, फोटो आणि अगदी आवाज यांचाही सहसा सहजपणे गैरवापर केला जातो.
तज्ज्ञ काय म्हणतात?विराग गुप्ता सुप्रीम कोर्टातील वकील आणि 'डिजीटल कानूनों से समृद्ध भारत' या पुस्तकाचे लेखक आहेत.
बीबीसी प्रतिनिधी अभय कुमार सिंह यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, "हा अंतिम निर्णय नाहीये, तर अंतरिम आदेश आहे आणि तोही एकतर्फी, म्हणजेच दुसऱ्या पक्षाचं म्हणणं न ऐकता देण्यात आलेला आहे."
"भारतातील कायद्यांमध्ये पर्सनालिटी राईट्सवर स्पष्टपणे कोणतीही तरतूद नाही. सचिन तेंडुलकरसारख्या काही सुप्रसिद्ध व्यक्ती आपले अधिकार ट्रेडमार्क करुन घेतात.
मात्र, ज्यांच्याकडे ही सुरक्षितता नाही, त्यांना कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि आयटी ऍक्ट यासारख्या वेगवेगळ्या कायद्यांची मदत घेऊन मग दिलासा मिळतो."
ते सांगतात की, "हायकोर्टाने या आदेशामध्ये कमर्शियल केस आणि राईट टू प्रायव्हसी या दोन्हीही गोष्टींना आधारभूत ठेवलं आहे.
भारतात गोपनीयतेच्या अधिकाराबाबत वेगळा कायदा नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी प्रकरणात कलम 21 अंतर्गत या गोष्टीला मान्यता दिली. या आधारावर इथेही दिलासा देण्यात आला आहे."
त्यांच्यामते, "हा आदेश जुन्या खटल्यांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन किंवा दलेर मेहंदी यांच्या बाबतीत जसं घडलं त्याच पद्धतीनं ऐश्वर्या राय यांनाही अंतरिम आदेश मिळाला आहे. हा काही ऐतिहासिक निर्णय नाही."
विराग गुप्ता पुढे असंही सांगतात की, "खरी अडचण आणि समस्या ही आहे की, जर एखाद्या सामान्य माणसासोबत असं घडलं तर तो ही महागडी कायदेशीर लढाई लढू शकत नाही.
भारतात पर्सनालिटी राईट्सबाबत कोणताही स्पष्ट असा कायदा नाहीये. त्यामुळे, न्यायलयं कॉपीराईट, आयटी ऍक्ट आणि संवैधानिक तरतुदींना एकत्र करुनच दिलासा देतात."
पुढील प्रक्रियेबद्दल ते म्हणाले की, "रजिस्ट्रार कोर्टासमोर जबाब आणि स्मरणपत्रं दाखल केली जातील. सर्व पक्षांचा जबाब पूर्ण झाल्यावर, प्रकरण पुन्हा पुरावे आणि सुनावणीसाठी न्यायाधीशांसमोर जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय येईल."
जर डिजीटल कंपन्यांनी अंतरिम आदेशाची अंमलबजावणी करण्यास अनिच्छा दाखवली तर पुन्हा न्यायालयात नवीन याचिका दाखल करता येईल, असंही विराग गुप्ता सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)