अहिल्यानगर ते परळी वैजनाथ… बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
Marathi September 15, 2025 09:25 PM

मुंबई : बीड (Beed) जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग (Railway) प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात आज नव्याने 150 कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग 50 टक्के असून, आजवर शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने 150 कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीचा उपयोग 2025-26 या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे 261 किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च 4 हजार 805 कोटी रुपये इतका आहे. त्यातील 50 टक्के म्हणजे 2 हजार 402 कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी 23 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता आणखी 150 कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण आज (दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी) करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग 2025-26 या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विभागीय, जिल्हास्तरीय तसेच मंत्रालयीन पातळीवर विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे.

“अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

गुणरत्न सदावर्तेंची लेक निघाली लंडनला, बॅरिस्टर होऊन परतणार; मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.