अॅलोपॅथी, आयुर्वेद एकात्मिक औषधोपचार प्रणाली हवी
esakal September 15, 2025 08:45 PM

पुणे, ता. १४ : जनरल प्रॅक्टिशनर्स बहुतेकवेळा मल्टीस्पेशालिस्ट असतात. त्यांचे काम सगळ्यात जास्त अवघड असते. आयुर्वेदापासून सुरवात करत ते अॅलोपॅथीच्याही पुढे आज आले आहेत. अॅलोपॅथी आणि आयुर्वेद अशी एकात्मिक औषधोपचार प्रणाली आपल्याला हवी आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स हे शक्य करतील, असे मत पुणे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी व्यक्त केले.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स प्रियदर्शिनी यांच्या वतीने महिला परिषद व ‘लेडी जीपी ऑफ द इयर’ पुरस्कार वितरण समारंभाचे टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजन केले होते. डॉ. रूपा अगरवाल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता आदी उपस्थित होते.
डॉ. बोराडे म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांची वाढ फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मकही आहे. महिलांचे योगदान मोठे असून संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास वैद्यकीय सेवा अधिक सुंदर होते. महिला डॉक्टरांमध्ये बाईपणाबरोबर आईपण देखील महत्त्वाचा गुण आहे, आईपण हा विचार, वृत्ती आणि सेवाभाव आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.