Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; काही भागांत तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने घरे, शाळा, मंदिरांत पाणी
esakal September 15, 2025 09:45 PM

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या काही भागांत शनिवारी (ता. १३) रात्री व रविवारी (ता. १४) मुसळधार पाऊस झाला. काही भागांत तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. घरे, शाळा, मंदिरांत पाणी शिरले. पाऊस व काही धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे नद्यांना पूर आला असून काही मार्ग बंद पडले.

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी पाऊस झाला. सरासरी दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पैठण आणि गंगापूर तालुक्यांना पावसाने झोडपले. जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिवच्या काही भागांना मात्र पावसाने धुमाकूळ घातला.

पिंगळी कोथळाला पुराचा वेढा

परभणी तालुक्यातील पिंगळी कोथळा गाव सध्या पुराच्या पाण्याने वेढले गेले. लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे गावाच्या मुख्य मार्गावरील संपर्क खंडित झाला. तर दुसऱ्या बाजूने करपरा नाल्याच्या पाण्याचा गावाला वेढा आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी गावात आज ढगफुटीसदृश पावसाने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, सोनपेठ, सेलू तालुक्यातही पाऊस झाला.

जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा झिरो फाटा हा राज्य महामार्ग पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे पूर्णा ते झिरो फाटा, पूर्णा- परभणी, पान पूर्णा-वसमत, पूर्णा-हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. सततच्या मुसळधारेमुळे लेंडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोली शहरासह जिल्हाभरात दुपारपर्यंत पाऊस होता. कयाधू नदी पुन्हा खळाळल्याने इसापूर धरणाचे सात दरवाजे ५० मीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ११ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

ढगफुटीसदृश पाऊस

जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यातील सहा मंडळांत शनिवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. गोंदी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि अंतरवाली मंडळात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस तर वडीगोद्री मंडळात पावणे दोनशे मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग, ढगफुटीसदृश पावसामुळे गोदावरीला जोडणाऱ्या उपनद्यानांही पूर आला आहे. नदीकाठावरील शेतवस्त्या तसेच पिके पाण्याखाली गेली असून नुकसान झाले आहे.

घरे, शाळा, मंदिरांत पाणी

घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव बंधाऱ्यातील पाणी भोगाव येथे शाळेच्या मैदानात साचले आहे. बानेगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पाणी शिरले आहे. बानेगावमधील गणपती व महादेव मंदिरास पाण्याने वेढा दिला होता. सौंदलगाव बुद्रुक, शेवता, लिंगशेवाडी येथे मंदिरापर्यंत पाणी आले. दरम्यान, गुंज,राजाटाकळी,सिरसवाडी, शिवणगाव,भादली या गावांत पाणी शिरले. अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरातील महाकाळा- साष्टपिंपळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. राजेशनगर येथील एका घरात पाणी शिरले. घुंगर्डे हादगावात घरे आणि दुकांनात पाणी शिरले. मांगणी नदीला पूर आल्याने १५ जण अडकून पडले होते. यंत्रणेने त्यांची सुटका केली. गोंदीतील जि.प. शाळेतही पाणी शिरले. शहागड परिसरात गोदावरीला मोठा पूर आला आहे.

गेवराई-उमापूर मार्ग ठप्प

बीड जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. माजलगाव धरणातून ३१ हजार ३३५ क्युसेकने सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे सांडस चिंचोली गावाचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील १८ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद असून बहुतांश नदी नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे गेवराई-उमापूर राज्य मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. गोदावरी आणि सिंदफणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४६.१ मिमी पाऊस झाला.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २९.८ मिमी पाऊस झाला. ढोकी मंडळात १३२.८, तेर १३२.८, जागजी मंडळात १०२, कळंब तालुक्यातील येरमाळा मंडळात १०० मिमी पाऊस कोसळला. धाराशिव तालुक्यात सरासरी ४९.८ मिमी पाऊस झाला.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात

पुणे ः नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे उशिराने माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मॉन्सूनने यंदा तब्बल दोन महिने १६ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला. वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) आदी प्रणाली तयार झाल्यानंतर मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.

Akola Accident : ट्रकच्या अपघातात नायगाव तालुक्यातील दोघांचा मृत्यू; अपघातात ट्रकचा चुराडा
  • मराठवाड्यातील ३३ मंडळांत अतिवृष्टी

  • काही ठिकाणी ढगफुटीसदृश बरसला

  • घरांत पाणी, मंदिरांना वेढा, काही मार्ग बंद

  • जायकवाडीतून १,१३,००० क्युसेकने विसर्ग

  • माजलगाव, इसापूर धरणांतूनही विसर्ग

  • गोदावरीसह विविध नद्यांना पूर

  • काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.