नवी दिल्ली : जास्मिन लाम्बोरिया व मीनाक्षी या भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. जास्मिन हिने या महिलांच्या ५७ किलो वजनी गटात आणि मीनाक्षी हिने ४८ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करीत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या नुपूर हिने रौप्यपदक आणि पूजा रानी हिने ब्राँझपदक पटकावले.
जास्मिन लाम्बोरिया हिने पोलंडच्या ज्युलिया झेरमेटा हिला ४-१ असे सहज पराभूत करताना ५७ किलो वजनी गटात चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. जास्मिनने हिने अंतिम फेरीच्या लढतीत ३०-२७, २९-२८, ३०-२७, २८-२९, २९-२८ असा विजय साकारला. मीनाक्षी हिने कझाकस्तानच्या नझीम कायझायबे हिला ४-१ असे नमवले व अजिंक्यपद साकारले. कझाकस्तानची नझीम कायझायबे हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावले होते.
भारताच्या दहा खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची किमया करून दाखवली आहे. जास्मिन लाम्बोरिया व मीनाक्षी यांनी यंदाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले.
याआधी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८), निखन झरीन (२०२२ व २०२३), सरीता देवी (२००६), जेनी आर. एल. (२००६), लेखा के. सी. (२००६), नीतू घंघास (२०२३), लवलीना बोर्गोहेन (२०२३), स्वीटी बुरा (२०२३) या खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला होता.
Satwiksairaj Chirag: लक्ष्यसह चिराग सात्त्विकही अंतिम फेरीत; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन, सेनची लढत चीनच्या दुसऱ्या मानांकित खेळाडूशी कडव्या झुंजीनंतर रौप्यभारताच्या नुपूर हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नुपूर व पोलंडची बॉक्सर अगाता कॅकमारस्का यांच्यामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. या लढतीत पोलंडच्या कन्येने ३-२ असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. नुपूर हिने रौप्यपदक पटकावले. या लढतीच्या अखेरच्या फेरीमध्ये निर्णायक क्षण पाहायला मिळाला. दोन खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत सुरू असताना पोलंडच्या खेळाडूने नुपूर हिच्यावर आक्रमण करीत ‘अप्पर कट’वर महत्त्वाचा गुण मिळवला. याच क्षणी तिचे सुवर्णपदक पक्के झाले. पूजा रानी हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.