काळेवाडी, ता.१५ : रहाटणीगावामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील भालेराव कॉर्नर चौकातील रस्ता दुभाजक वाहनचालकांना रहाटणी चौकातून कोकणे चौकाकडे तसेच पिंपळे सौदागर महादेव मंदिरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
रहाटणीगाव बस स्थानक येथील भालेराव कॉर्नर चौकातील रस्ता दुभाजक अशास्त्रीय पद्धतीने विकसित केले आहेत. वाहनांना वळण घेण्यासाठी तेथे रस्ता दुभाजकाची व्यवस्था आहे. मात्र, ती गुंतागुंतीची व न समजणारी असल्याने वाहन चालकांचा गोंधळ होत आहे. रहाटणी चौकात काळेवाडी व रहाटणी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुण्याकडे व हिंजवडीकडे जाण्यासाठी रहाटणी चौकातून वळण घेऊन अनेक नोकरदार या रस्त्याने वाहने घेऊन प्रवास करत असतात. परंतु भालेराव कॉर्नर येथील रस्ता दुभाजक हे अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहेत. वाढत्या रहदारीमुळे ते आता वाहनांना वळण घेण्यासाठी धोकादायक, लहान व चुकीचे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
समस्या अन् मागण्या
- भालेराव कॉर्नर चौक आणि रस्त्याच्या विस्तारीकरणाकडे लक्ष द्यावे
- रहाटणी फाट्याकडील व महादेव मंदिराकडून येणारी वळणे चुकीची
- वाहनचालकांचा गोंधळ, त्याने अपघाताला निमंत्रण
- दोन्ही रस्ते अरुंद व दुभाजक अशास्त्रीय, रस्ते रुंद करावेत
- वाहतूक चिन्हे, सूचना फलक लावावेत, दुभाजक नव्याने करावेत
पाठीमागील वाहने बस मार्गात
एका बाजूला पीएमपीएलचे बस स्थानक तर दुसऱ्या बाजूला शाळा आहे. इथे मोठ्या बस लांबून पुढे जात वळण घेतात. त्यामुळे मागून येणारी छोटी वाहने बसच्या मार्गात येऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वाहनचालक गोंधळून नक्की कोणत्या बाजूने वळावे, याचा विचार करत वळतात व अपघात होत आहेत.
रहाटणी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून वाहने वळविताना विरुद्ध बाजूने वळावे लागते. परंतु, तेथील वळण अरुंद आहे. त्यामुळे रस्ता व चौक नव्याने विकसित केला जावा.
- सिद्धार्थ कणसे, रहिवासी
चौक परिसरात बस स्थानक व शाळा असून इथे गर्दी असते. त्याचप्रमाणे सकाळ व सायंकाळ वाहनांची गर्दी असल्यामुळे चौकाचा विस्तार होणे गरजेचे आहे.
- सविता चव्हाण, नागरिक