रेवदंडामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळित
रेवदंडा, ता. १५ (बातमीदार) : चौल-रेवदंडामध्ये रविवारी (ता. १४) सायंकाळी पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने जनजीवन विस्कळित झाले. रविवार सुट्टीचा वार असल्याने अनेक जण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. घराबाहेर पडताना मात्र अनेकांनी छत्री किंवा रेनकोट घेतला नसल्याने पावसात भिजतच घर गाठताना नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही जणांनी रिक्षाचा आधार घेतला.
सोमवारी (ता. १५) सकाळपासूनच पुन्हा पावसाने मुसंडी मारल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. पावसामुळे विविध विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत होती.
शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसत होती. लालपरीचे वेळापत्रक कोलमडलेले दिसत होते. सरकारी कार्यालयात कामकाज धीम्या गतीने सुरू होते. बॅंका व डाकघरमध्ये व्यवहार करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ घटलेली होती. सखल भागात पाणीच पाणी साठलेले होते.
रेवदंडा - बातमीदार.