निगडी, ता.१५ : खंडोबा चौक ते काळभोरनगर चौक या मुख्य रस्त्यावर धोकादायक गटारामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारावर लोखंडी जाळी असून ती वाहनांच्या रहदारीमुळे कधीही तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यावर हे गटार स्पष्ट दिसत नाही. परिणामी, दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. बस आणि जड वाहने जाताना त्यावरील जाळी हालत असल्याचे वारंवार दिसते
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. चेंबरची अशी अवस्था राहिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
पावसाळ्यात पाणी साचल्यावर कुठे खड्डा आहे, कुठे गटार आहे, हे समजत नाही. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
- सीमा पाटील, नागरिक
लोखंडी जाळी हालते. कधी कधी चाक त्यात अडकते. थोडा जरी वेग असेल तरी गंभीर अपघात होऊ शकतो. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर अशी अवस्था असणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे.
- अमोल देशमुख, दुचाकीस्वार
या रस्त्यावरून प्रवासी नेताना खूप भीती वाटते. गटाराची जाळीने वाहनांना धक्का बसतो. वाहन खराब होण्याचीही शक्यता असते. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- राजेंद्र वाघ, रिक्षाचालक