बनावट प्रमाणपत्र वकिलाला भोवले
पनवेल शहर पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल
पनवेल, ता. १५ (वार्ताहर) : न्यायालयातील बोगस वारस दाखल्याचे प्रकरण ताजे असताना पनवेल न्यायालयात अल्पवयीन असल्याचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाशीतील बांधकाम व्यावसायिक असलेले लाधवजी पटेल (५७) यांनी उलवे सेक्टर-१७ येथील भूखंड क्रमांक १७३, क्षेत्रफळ १०.५० गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी २०१८ पासून मदन घरत तसेच इतर भागीदारांशी व्यवहार सुरू होता, मात्र हिस्सेदार गिरीधर रमाकांत घरत यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीस दोन अल्पवयीन मुले वारस ठरले. त्यामुळे जमीन खरेदी करण्यासाठी पटेल यांना न्यायालयातून अल्पवयीन असल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. यासाठी पटेल यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता; मात्र प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याने मृत गिरीधर घरत यांचा ओवळेतील चुलतभाऊ सागर घरत याने एक लाखात प्रमाणपत्र मिळत असल्याचे सांगितले होते.
-------------------------------
असा झाला उलगडा
पनवेल न्यायालयात पटेल यांनी सादर केलेली प्रत बोगस असल्याचे उघड झाले. तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा स्वाक्षरी शिक्कादेखील बनावट होता. या प्रकरणात वकिलामार्फत सागर घरतला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर खारघर येथील वकिलाची बनावटगिरी उघड झाल्याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.