समाजमाध्यमांवर ‘जिहाद’ची तयारी
‘सीईओ,’ ‘प्राध्यापक’ अशा सांकेतिक नावांनी दहशतवादी कृत्ये
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : देशात गुप्तपणे दहशतवादी कारवाया घडवण्याचा एक गंभीर प्रयत्न अलीकडेच उघडकीस आला. काही तरुण समाजमाध्यमांवर ‘सीईओ’, ‘प्राध्यापक’ अशा टोपण नावांनी काम करीत होते. त्यांच्या या नियोजनाचा उद्देश भारतात दहशत माजवणे हा होता. समाजमाध्यमे तसेच डार्क वेबसारख्या प्लॅटफॉर्मवरून संवाद साधत त्यांनी ‘प्रोजेक्ट मुस्तफा’ नावाने एक ग्रुप तयार केला होता. पाकिस्तानातील हँडलर्सकडून थेट आदेश घेत हे तरुण राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते; मात्र दिल्ली पोलिसांनी वेळेवर पावले उचलत या नेटवर्कवर कारवाई केली अन् एक मोठा दहशतवादी कट रोखण्यात यश आले. अटक केलेल्या तरुणांकडून शस्त्रास्त्रं, स्फोटके आणि महत्त्वाची माहिती जप्त केली. यात कल्याण, मुंब्र्यातील तरुणांचा समावेश आहे.
दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकावर नुकतीच दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. यात दोन कट्टरपंथींना अटक केली. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले हे तरुण ‘इसिस’च्या प्रोजेक्ट मुस्तफाच्या कटासाठी निघाले होते; मात्र पोलिसांच्या दीर्घ पाठलागानंतर त्यांच्या स्वप्नातील ‘जिहाद’ चकनाचूर झाला. या अटकेनंतर उघड झालेली माहिती देशाला हादरवणारी आहे. सहा महिन्यांपासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य एटीएस विभागाने एका नेटवर्कवर नजर ठेवली होती. समाजमाध्यमांचा वापर करणारे काही तरुण अचानक कट्टर झाले होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. ते कोणाशी बोलतात, कुठे जातात, काय योजना करतात, सर्व गोष्टींचा तपशील हेरला जात होता.
सप्टेंबरच्या एका रात्री पोलिसांच्या गुप्त पथकाने दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर सापळा रचला. मुंबईकडे परतण्याच्या तयारीत असलेला कल्याणचा आफताब कुरेशी (२५) आणि मुंब्रा रहिवासी सुफियान अबुबकर खान (२०) अचानक पोलिसांच्या घेरावात सापडले. थोड्या झटापटीत दोघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून ३२ बोरची दोन पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच क्षणी पोलिसांना खात्री पटली, ही फक्त सुरुवात आहे आणि मागे अजून मोठे जाळे आहे. या जाळ्याचा मुख्य नेता झारखंडमधील अशर दानिश (२३) होता. त्याने स्वतःला ‘सीईओ’ आणि ‘प्राध्यापक’ अशी टोपणनावे दिली होती.
दानिशने ‘प्रोजेक्ट मुस्तफा’ नावाचा समाजमाध्यमांवर ग्रुप बनवला होता, ज्यामध्ये ४० तरुण जोडलेले होते. यामध्ये कल्याण तसेच ठाण्यातील काही तरुणांचा समावेश होता. तपासात उघड झाले की, तो पाकिस्तानस्थित हँडलर्सशी थेट संपर्कात होता. पलामू आणि बोकारो येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये त्याच्या खोलीतून सल्फर, नायट्रिक ॲसिड, सर्किट्स, तांब्याच्या प्लेट्स, पिस्तुले आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. निजामाबादचा हुजैफ यमन (२०) याला शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते, तर कामरान कुरेशी (२६) या ऑपरेशनसाठी निधी हाताळत होता. पाकिस्तानशी संपर्क साधताना हे तरुण ‘प्रोफेसर’, ‘सीईओ’, ‘गजवा लीडर’ अशा कोडवर्ड वापरत होते. अनस्क्रिप्टेड कॉल्स, डार्क वेब आणि एन्क्रिप्टेड चॅट्स हे त्यांचे मुख्य शस्त्र होते.
मोठा कट रोखण्यात यश
तरुणांना ऑनलाइन ब्रेनवॉश करून जिहादी प्रचार शिकवला होता. सततच्या निगराणीमुळे आम्ही योग्य क्षणी कारवाई केली. या मॉड्यूलचा पूर्णत: भांडाफोड करून देशातील दहशतीचा मोठा कट रोखण्यात आला, असे विशेष कक्षाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले.
अटक केलेले आरोपी
अटक झालेल्यांमध्ये झारखंडमधील सूत्रधार अशर दानिश (२३) याच्यासह कल्याणचा आफताब कुरेशी (२५), मुंब्रा येथील सुफियान अबुबकर खान (२०), निजामाबादचा हुजैफ यमन (२०) आणि मध्य प्रदेशातील कामरान कुरेशी ऊर्फ समर खान (२६) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सोशल मीडियावरून संपर्क साधून पाकिस्तानस्थित हँडलर्सशी थेट संवाद साधत होते.
नेवाळीच्या आफताबची पार्श्वभूमी
अटकेत कल्याणचा आफताब कुरेशी सर्वाधिक चर्चेत आला. त्याचे वडील मटणविक्रेते, तर मुलगा दहशतीच्या मार्गावर! सतत मोबाईलवर अतिरेकी व्हिडिओ पाहणे, घरच्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे आणि शेवटी दिल्लीला पळून जाणे. यामुळे त्याच्या कुटुंबात वारंवार वाद व्हायचे. शेवटी पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला.
नेटवर्कचे उद्दिष्ट
* ‘गजवा-ए-हिंद’च्या विचारसरणीवर आधारित जिहाद उभा करणे
* भारतामध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवणे
* काही राजकीय नेत्यांच्या हत्येची योजना आखणे
* स्वयंसेवी संस्थेच्या आडून जमीन घेऊन ‘अल-शाम’ नावाचे स्वतंत्र क्षेत्र जाहीर करणे