देसाई अध्यापक विद्यालयात हिंदी दिन
रत्नागिरी ः मराठा मंदिर, स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी विषय विभागप्रमुख प्रा. सुनील जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बॅंक ऑफ इंडियाचे डेप्युटी झोनल मॅनेजर अंजनी कुमार सिंग आझाद आणि किरकोळ व्यापारकेंद्र अधिकारी किरण खोपडे हे लाभले होते. हिंदी दिवसानिमित्त प्रमुख अतिथींच्या हस्ते हिंदी अंकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अतिथींनी विद्यार्थ्यांना बँकेसंदर्भात मार्गदर्शन केले.
पर्यटनदिनानिमित्त निबंध स्पर्धा
रत्नागिरी ः दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रवास सल्लागार वरूण लिमये व विश्वविहार हॉलिडेजतर्फे पर्यटनविषयक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून, कोणतीही वयोमर्यादा नाही. सहभागी स्पर्धकांना भारताचे पर्यटन, जागतिक पर्यटन आणि पर्यटनाचा इतिहास या विषयांवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहायचा आहे. निबंध ४०० ते ६०० शब्दांत असावा. निबंध सादर करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर आहे. विजेत्यांना २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत एका कार्यक्रमात बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.
संस्कृतभारतीतर्फे रत्नागिरीत गीतापठण वर्ग
रत्नागिरी ः संस्कृत भारतीतर्फे रत्नागिरी शहरात पाच ठिकाणी २२ सप्टेंबरपासून गीतापठण वर्गांची सुरुवात होणार आहे. या वर्गांमध्ये गीता म्हणायला शिकवले जाणार आहे. हे वर्ग निःशुल्क असून, यासाठी वयाची अट नाही. रत्नागिरीमध्ये आठवड्यातून दोन दिवस हे वर्ग चालवले जातील. दर सोमवार व गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत विश्वशांती संकुल, दैवज्ञ भवनजवळ संपदा निमकर, गुरुवार व शनिवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर येथे किशोरी मोघे शिकवणार आहेत. मंगळवार व बुधवारी सायंकाळी ४ ते ५ वेळेत गजानन महाराज मंदिर, नाचणे रस्ता येथे अमृता आपटे, सोमवार आणि गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ घाणेकर आळीत चिन्मयी सरपोतदार आणि खेर संकुल, टिळक आळी येथे मंजिरी आगाशे शिकवणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन संस्कृतभारतीतर्फे करण्यात आले आहे.