एसटीच्या आपत्कालीन सेवेची दखल
पालघर, बोईसर आणि सफाळे आगार प्रमुखांचा प्रशस्तीपत्राने गौरव
मनोर, ता. १५ ः ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली असताना रेल्वे प्रवाशांसाठी आपत्कालीन सेवेअंतर्गत बससेवा उपलब्ध करून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी सेवा दिली होती. याची दखल घेत एसटीच्या आगार प्रमुखांचा प्रशस्तीपत्राने गौरव करण्यात आला आहे. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून एसटीच्या पालघर, बोईसर आणि सफाळे आगार प्रमुखांना प्रशस्ती पत्र देण्यात आले.
दोन आठवड्यांपूर्वी बोईसर आणि वाणगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपर्क साधण्यात आला. यानंतर एसटीचे विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता (चालन), विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बस सेवा उपलब्ध करून दिली होती. पालघर, बोईसर आणि सफाळे आगारातून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत बसफेऱ्या उपलब्ध करून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले.
एसटी विभागाने आपत्ती काळात दिलेल्या सेवेची दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी पालघर, बोईसर आणि सफाळे आगारांच्या आगार प्रमुखांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.