प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट
esakal September 16, 2025 02:45 PM

rat१५p४.jpg-
२५N९१६२१
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात क्षेत्रभेटीदरम्यान माहिती देताना डॉ. संतोष वानखेडे.

‘डीजीके’ची नारळ संशोधन केंद्रास भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट दिली. विद्यार्थ्यांना प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कार्य आणि महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेती आणि कृषी संशोधनाचे कार्य जवळून समजून घेण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरली. द्वितीय व तृतीय वर्ष कला शाखेतील १५ विद्यार्थी यात सहभागी झाले. केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी नारळाच्या विविध जाती, रोग आणि कीड व्यवस्थापन, नवीन संशोधन पद्धतींची माहिती दिली. त्यांनी नारळ उत्पादनात वाढ करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या पद्धतींची माहिती दिली. नारळाच्या झाडांची काळजी कशी घ्यावी, खत आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. नारळासोबतच दालचिनी, जायफळ, काळी मिरी, रातांबा, केळी, अननस इत्यादी मसाल्याच्या आणि फळपिकांची माहिती दिली. या केंद्रात नारळ, मसालापिके आणि फळपिकावरील संशोधनाच्या आधारावर लाखी बाग ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक एकर जागेत नारळासोबतच मसालापिके व फळपिके यांची सेंद्रिय पद्धतीने एकत्रित लागवड केली जाते. यामुळे कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवून देणारी ही एक प्रभावी पद्धत विद्यार्थ्यांना अवगत झाली. क्षेत्रभेटीस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्मार्था कीर आणि प्रा. वैभव कीर उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.