मटकाकिंग नन्नू शहाच्या पावलावर पुतण्या
esakal September 16, 2025 02:45 PM

मटकाकिंग नन्नू शहाच्या पावलावर पुतण्या?
सुरज शहा खंडणी प्रकरणात पोलिसांच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : सोशल क्लबच्या आडून सुरू असलेल्या मटका-जुगार साम्राज्याचा किंगपिन जिग्नेश उर्फ मुनिया ठक्कर याची गोळ्या झाडून हत्या होऊन पाच वर्षे लोटली आहेत. या खुनाच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार ठरलेला धर्मेश उर्फ नन्नू शहा सध्या तळोजा कारागृहात असूनही त्याची अंडरवर्ल्डवरील पकड अद्याप कायम असल्याची चर्चा आहे. नन्नू शहा हा एकेकाळी छोटा राजन टोळीचा शार्पशूटर होता. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरीसह १५ गुन्हे दाखल आहेत. त्याने ३१ जुलै २०२० रोजी कल्याण रेल्वेस्थानकाजवळील नीलम गेस्ट हाउसच्या गल्लीत मुनिया ठक्करवर पाच गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणात त्याच्यासोबत त्याचा बाऊन्सर जयपाल उर्फ जापान डुगलज याचाही सहभाग होता. हत्या करून तो गुजरातला फरार झाला होता, परंतु २९ ऑगस्ट २०२० रोजी त्याला अटक करण्यात आली. या हत्येनंतर मुनियाचे मटका साम्राज्य कोलमडले आणि त्याची सूत्रे नन्नू शहाकडे गेल्याचे मानले जाते. त्यामुळे स्थानिक अंडरवर्ल्डमध्ये नन्नू शहा हे नाव पुन्हा चर्चेत आले.

सध्या तुरुंगात असलेल्या नन्नू शहाच्या पुतण्यानेही काकाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरज शहा या पुतण्याने कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. “पेट्या नाही दिल्या, तर टपकावू” अशा प्रकारे धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे कोळसेवाडी पोलिसांनी सुरज शहा याचा सखोल तपास सुरू केला आहे. तो काकाच्या नावे धमक्या देत आहे का? कारागृहात असलेल्या नन्नू शहाशी त्याचा संपर्क आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणात सुरजने आणखी कोणाला धमकावले आहे? खंडणीसाठी त्याचा कोणाशी संपर्क होता? या संदर्भातील अनेक बाबींची चौकशी पोलिस करत असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.