Mumbai News: ई-बाइकविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटना, राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
esakal September 17, 2025 09:45 PM

मुंबई : ई-बाइक टॅक्सीभाडे निश्चितीमुळे रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये नाराजी आहे. लवकरच राज्यव्यापी बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका जाहीर करणार, अशी माहिती ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने देण्यात आली आहे.

ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, ‘राज्य सरकारने नुकतीच खासगी टॅक्सी आणि दुचाकी कंपन्यांना मुंबई आणि पुण्यात ई-बाइक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच, राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांमधील परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांसाठी भाडे निश्चिती बंधनकारक केली आहे.

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

या निर्णयानुसार, पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि एकतर्फी असून, भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची हानी केली जात आहे. सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे.’

ई-बाइक टॅक्सीभाडे निश्चिती निर्णयाविरोधात ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने लवकरच राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.

- डॉ. बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन

Mumbai News: जुन्या वाहनांवर ‘मामा’, ‘दादा’ क्रमांक! मुंबईत ६५ चालकांना दंड
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.