दादरमधील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे ( शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी) यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घचना आज सकाळी उघड झाली. यामुळे एकच खळबळ माजली. ही बातमी समोर येताच शिवाजी पार्क परिसरात हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. या घटनेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचे अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे. सध्या इथले वातावरण संवेदनशील असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी शिवाजी पार्क परिसरात, मीनाताई यांचा पुतळा आहे, त्या परिसरात येण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेतकर आणि स्आथनिक शिवसानिकांकडून ही माहिती मिलत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली व त्यानंतर त्यांना अभिवादनही केले. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना घडलेल्या प्रकाराबाबात संपूर्ण माहिती दिली. दुपारपर्यंत उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी येतील, झालेल्या प्रकाराची माहिती ते घटनास्थळी येऊन घेतील, पाहणी करतील असे समजते.
दरम्यान हे गांडू लोकांचं काम असल्याचे म्हणत मिलिंद नार्वेकर यांनी झालेल्या प्रकाराबाबत संतप्त शब्दांत निषेध नोंदवला.तर कोणीतरी पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे, सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळेल असं म्हणत शिवसना (ठाकरे गट ) नेते अनिल देसाई आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे, रंग कोणी फेकला, यामागे कोण आहे ते लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. आमच्यासाठी हा भावनिक विषय आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे, कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं.
नेमकं काय झालं ?
दादरमधील छ.शिवाजी महाराज पार्क मैदानात मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. सकाळी 10 च्या सुमारास पुतळ्यावर आणि त्याच्या पायथ्याशी लाल रंग पडल्याचे आढळले. ही बातमी समोर येतेचा ठाकरे गटाचे नेते, तसेच अनेक शिवसैनिकांनी तिथे धाव घेतली. घडलेल्या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते, त्यापैकी काहींनी तातडीने या पुतळ्याची स्वच्छता करण्यास सुरूवात करत तो रंग तिथून हटवला. मात्र पुतळ्यावर रंग फेकण्याच्या या घटनेमुळे शिवाजी पार्क परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळ गाठत पोलिसांनी तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणावर अनेकांनी नाराजी वर्तवत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.