सध्या आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत आज 17 सप्टेंबर रोजी ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात सामना नियोजित होता. दोन्ही संघांसाठी सुपर 4 च्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये हा सामना कोणता संघ जिंकणार आणि सुपर 4 फेरीचं तिकीट मिळवणार? याची उत्सूकता होती. मात्र या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने यूएई विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार घातल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
टीम इंडियाने रविवारी 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आणि सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं. टीम इंडिया ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्याआधी टॉस दरम्यान पाकिस्तान कर्णधार सलमान आगा याच्यासह हस्तांदोलन केलं नाही. तसेच सामन्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलनासाठी मैदानात उभे होते. मात्र भारतीय संघाने विजयानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलन टाळलं. त्यामुळे पाकिस्तानची जगासमोर लाज गेली.
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळणं पाकिस्तानच्या चांगलंच जिव्हारी लागलं. टीम इंडियाने हस्तांदोलन टाळण्याला मॅच रेफरी जबाबदार असल्याचा अजब दावा पाकिस्तान क्रिकेट टीमने केला. पाकिस्तान टीम इतक्यावरच थांबली नाही. पाकिस्तान क्रिकेट टीमने मॅच रेफरी एन्डी पाईक्रॉफ्ट यांची आयसीसीकडे तक्रार केली. पाईक्रॉफ्ट यांनी या सामन्यात नियमांची अचूक अंमलबजावणी केली नसल्याची तक्रार पाकिस्तानने आयसीसीकडे केली. तसेच पाईक्रॉफ्ट यांची आशिया कप स्पर्धेतून तडकाफडकी हलाकपट्टी करावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसीकडे केली.
तसेच आयसीसीने कारवाई न केल्यास आम्ही या स्पर्धेत खेळणार नाही, असा इशारा आयसीसीला दिला होता. मात्र आयसीसीने पाकिस्तानला अपेक्षित अशी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
दरम्यान पाकिस्तान आणि यूएई या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 2 पैकी 1-1 सामना जिंकलाय. त्यामुळे दोघांच्या खात्यात प्रत्येकी 2-2 गुण आहेत. तर उभयसंघांचा 17 सप्टेंबरला एकमेकांविरुद्ध होणारा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना होता. या दोघांपैकी हा सामना जिंकणाऱ्या संघाला सुपर 4 चं तिकीट मिळणार होतं. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने माघार घेतल्याने यूएईला 2 गुण मिळणार आहेत. त्यामुळे यूएई ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरणार आहे.