Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक
esakal September 18, 2025 06:45 PM

खापरखेडा (जि. नागपूर) : चनकापूर येथे अकरा वर्षीय विद्यार्थी जितू युवराज सोनेकर (रा. वार्ड क्रमांक २, एअरटेल टॉवरजवळ, खापरखेडा) याचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून नागरिकांनी जितूच्या मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर आरोपींना फाशीची मागणी केली.

जितू शंकरराव चव्हाण विद्यालयात सहावीत शिकत होता. तो १५ सप्टेंबरला शाळेत गेला. मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतला नाही. मित्रांनी त्याला नागमंदिराजवळ एका व्यक्तीसोबत बोलताना पाहिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तो पांढऱ्या कारमध्ये बसून अण्णामोडमार्गे गेला, अशी चर्चा होती. बराच शोध घेतल्यानंतरही तो सापडला नसल्याने कुटुंबीयांनी खापरखेडा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Lover Killed Girl : सोशल मीडियावर महिन्याची ओळख, प्रियकराला भेटल्यानंतर तीचा खून केला अन् आंबा घाटात फेकला मृतदेह पण एक चूक...

बुधवारी सकाळी चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला जितूचा मृतदेह झुडपात पडलेला आढळला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली. गळा दाबून हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीपी, डीसीपी आणि क्राईम झोन-५ चे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान जितूची स्कूल बॅग घटनास्थळी सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल पाल, अरुण भारती व यश वर्मा (तिघेही रा. चनकापूर) यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

फॉरेन्सिक पथकाने पाहणी

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली असून, खापरखेडा पोलिस आणि क्राईम झोन-५ च्या पथक यांच्या संयुक्तपणे तत्काळ तपास सुरू केला. जितूची हत्या आई वडिलांनी नाही तर परिचित व्यक्तीकडून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

अशी केली हत्या...

अपहरणानंतर जितुला कारमध्ये फिरवत वाहनात आरोपींनी गळा दाबून त्याची हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी दोन दिवस चनकापूरमधील एका क्वॉर्टरमध्ये मृतदेह लपवून ठेवला. परंतु प्रकरणाची चर्चा सुरू झाल्याने भीतीमुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर मृतदेह झुडपात टाकून आरोपी फरार झाले.

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू एक आरोपी कुटुंबासोबतच फिरत होता

जितू व त्याचा एक भाऊ, आईजवळ राहून शिक्षण घेत होते. आई व वडिलांमध्ये काही भांडण झाल्याने आई खापरखेड्यात वेगळी राहून मुलांचा सांभाळ करीत होती. वडील चनकापूर येथे राहायचे. वडील भाजीपाला विकतात. तर आरोपीसुद्धा चनकापूर परिसरातच राहतात. या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तीन आरोपींपैकी एक आरोपी हा मृताच्या कुटुंबासोबत वावरत होता. इतकेच नव्हे, तर मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीत तो उभा असल्याची माहिती समोर आली.

घटनेमुळे परिसरात संताप

या घटनेमुळे खापरखेडा व चनकापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. जितूचा मृतदेह खापरखेडा पोलिस स्टेशनसमोर आणून न्यायाची मागणी करण्यात आली.

पैशाचा हव्यासातून घडली घटना

या अमानुष कृत्यामागे पैशाचा हव्यास असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस तपासातून निघाला आहे. मृताच्या वडिलांना मध्यप्रदेशातील शेती विकून मोठी रक्कम मिळेल, अशी अफवा आरोपींपर्यंत पोहोचली होती. यावरून तिन्ही आरोपींनी बालकाचे अपहरण करून गळा दाबून हत्या केली. अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.