संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा
esakal September 19, 2025 01:45 PM

संगमनेरः संगमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे.

या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित राहावे लागत होते. कर मात्र तिप्पट दराने वसूल होत असल्याने नागरिक नाराज होते. परंतु अखेर शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर आता आमदार अमोल खताळ यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

संगमनेरकरांचा ४० वर्षांचा भूविवाद अखेर मार्गी लागणार असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. ढोलेवाडीतील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळणार आहे.

संगमनेर बु. येथील सिटी सर्वे नं. १६५० ई या मिळकतीवरील सत्ताप्रकार ब नोंदी काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांना कायदेशीर व्यवहार करताना येणारे अडथळे भविष्यात दूर होणार आहेत. तसेच गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर व राजापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची कार्यवाहीही सुरू झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकेल.

याचबरोबर, संगमनेर बु. येथील सर्वे नं. १०४, १०५ व २१९ या जमिनींवरील मणियार कुटुंबाच्या खोट्या कब्जेदार नोंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, यामध्ये इंदिरानगर, शिवाजी नगर, मालदाड रोड, घोडेकर मळा (पंपिंग स्टेशन) याभागातील नागरिकांच्या अडचणी देखील सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळणार आहेत.

शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याबाबत आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या प्रकरणाबाबत सकारात्मक असून, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी आमदार अमोल खताळ यांना या आरक्षणावर मार्ग काढणार असल्याचे आश्वस्त केले आहे.

आमदार अमोल खताळ यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काही नेते याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत, पण ‘ये पब्लिक हे सब जानती है’ की वस्तुस्थिती काय आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच ४० वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मी संगमनेरकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.