कल्याण पूर्वेत वर्दळीच्या मार्गावर लोखंडी कमानी
कल्याण, ता. १८ (बातमीदार) : तीसगाव, पुना लिंक रोड भागात नवरात्रोत्सवानिमित्त काही राजकीय नेते, नवरात्रोत्सव मंडळांनी भक्तांचे स्वागत करण्यासाठी चौकाचौकात कमानी उभारल्या आहेत. या कमानींमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. काही ठिकाणी पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे कमानींमुळे झाकोळले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. कल्याण पूर्व भाग नेहमीच वाहन वर्दळीने गजबजलेला असतो. या भागातून उल्हासनगर, विठ्ठलवाडी, चक्कीनाक्याकडे जाणारी वाहने धावतात. अशा परिस्थितीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर नवरात्रोत्सवानिमित्त लावलेल्या स्वागत कमानींमुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेने अशा भव्य कमानींना परवानगी देताना वाहतुकीचा विचार करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पश्चिमेत रस्तोरस्ती नवरात्रोत्सव ते दिवाळीदरम्यान कमानी लागण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवानिमित्त उत्सवाच्या ठिकाणी गरबा खेळले जातात. काही रस्ते बंद केले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बदल केल्याने वाहनचालकांना इच्छित स्थळी जावे लागते. हा त्रास कायम असताना आता कमानींचे अडथळे सुरू झाल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
कल्याण पूर्वेतील तीसगाव परिसरात कमानी उभारल्या आहेत. यावर जाहिरातीचे फलक लागल्याने पालिकेचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेले कॅमेरे काही ठिकाणी झाकले गेले आहेत. शहरातील गुन्हेगारी, गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे हे कॅमेरे कोठेही कमानी, फलक यांच्यामुळे झाकोळणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.