वाणगाव, ता. १८ (बातमीदार) : डहाणू, तलासरी परिसरात चिकू फळावर बुरशीजन्य रोगाने थैमान घातले आहे. गुजरातमधील नवसारी येथील कृषी विद्यापीठांमधील वैज्ञानिक कृषी शास्त्रज्ञांनी डहाणू, तलासरी भागातील चिकू बागांची पाहणी केली. तलासरीतील ब्राह्मण पाडा, बोरीगाव, झाई आणि डहाणूतील घोलवड, राई, कसारा, झारली, रामपूर या भागातील नुकसानग्रस्त बागांची बुधवारी (ता. १७) पाहणी केली. आयसीएआर निर्देशानुसार, नवसारी कृषी विद्यापीठाने त्यांच्या कृषी विद्यालय आणि फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची समिती चिकूवरील बुरशीजन्य रोगाच्या बाबतीत अडचणी सोडविण्यासाठी पाठवली होती.
शास्त्रज्ञांची समितीने भेट दिलेल्या आठपैकी सात वाड्यांमध्ये फायटोप्थेरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला. बागेत फायटोप्थेरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांमुळे गळून पडलेल्या फळांचा ढीग पाहून समितीने चिंता व्यक्त केली. बोरीगाव येथील सभागृहात झालेल्या चर्चासत्रात परिसरातील सुशिक्षित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. नवसारी येथील कृषी विद्यापीठातील फळशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. तांडेल, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. पटेल, डॉ. ए. पी. पटेल, फळ संशोधन केंद्र कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. के. डी. बिसाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भूगर्भातील पाण्याची क्षारता जास्त असलेल्या चिकू बागायतीमध्ये, तसेच उन्हाळ्यात पाण्याची ओढ दिलेल्या बागेत फायटोप्थेरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, असे पाहणीदरम्यान आढळून आले. वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी पाने, फळे, फुले आणि झाडाची मुळे, तसेच मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांचे अहवाल उपलब्ध झाल्यानंतर एकात्मिक पद्धतीने प्रभावी रोग नियंत्रण ठेवण्यासाठीचे खते आणि रोगनाशके यांच्या वापराबाबतचे वेळापत्रक देण्याचे मान्य केले आहे.
फायटोप्थेरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पावसाळ्यातील कुंद वातावरण आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याचे प्रमाण वाढत चालले आहे, यावर एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीने उपाययोजना किमान तीन वर्षे करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत गावपातळीवर कार्यरत शेतकरी मंडळे, शेतकरी सहकारी संस्था आणि जिल्हा चिकू उत्पादक शेतकरी संघटना यांनी एकत्रितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- डॉ. ए. पी. पटेल, फळ रोगशास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ, नवसारी
दौऱ्याचा अहवाल नवसारी कृषी विद्यापीठामार्फत आयसीएआर, दिल्ली यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर आयसीएआर आणि एनएचबी यांच्या सल्ल्यानुसार एकात्मिक रोग नियंत्रण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल, तसेच सरकारदेखील माहिती देण्यात येणार आहे. चिकू बागायतदार संघटित झाल्यामुळेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संशोधन संस्थांमार्फत आपल्या समस्या सोडविणे शक्य होत आहे.
- डॉ. के. डी. बीसाणे, कीटकशास्त्रज्ञ, फळ संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, नवसारी