राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने चिंतन शिबीर आयोजित केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार टीव्ही 9 मराठीशी बोलले. राज्यातलं समीकरण सलोखा बिघडताना दिसतोय त्यावर तुम्हाला काय वाटतं? “माझं तुम्ही बीडचं, पुण्यातलं भाषण ऐकलं असेल, सामरोपाच भाषण करणार आहे. महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे टिकतील असं माझं स्पष्ट मत आहे. आज काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी विधानसभेला सपाटून मार खाल्ला, म्हणून काही जण या परिस्थितीचा फायदा उचलता येतो का? याचा प्रयत्न करतायत हे दुर्देवी आहे. आमची भूमिका आहे, ज्याला जे मिळतय त्याच्या तोंडातून काढून दुसऱ्याला मिळू नये. पण ज्याचा अधिकार आहे, त्याला ते मिळालं पाहिजे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत” असं अजित पवार म्हणाले.
50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे का? त्यावर अजित पवार म्हणाले की, “EWS ला 10 टक्के आरक्षण दिलं. संसदेत कायदा पास केला. घटनेत दुरुस्ती केली. 52 टक्के आरक्षणाव्यतिरिक्त जाऊन ते आरक्षण आहे. ते का टिकलं, जे गरीब लोक आहेत. ते कुठल्याही समाजातले असोत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे” बीडची दंगल शरद पवारांच्या आमदारांनी घडवून आणली असा छगन भुजबळ यांनी आरोप केला. “काल मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं. आज सकाळी इथे आल्यानंतर ते त्या बाजूला होते, मी या बाजूला होतो. लंचनंतर त्यांचं काय मत आहे ते जाणून घेणार आहे” असं अजित पवार म्हणाले.
‘अरे ला का रे करणं सगळ्यांनाच येतं’
राजकरणात स्तर घसरतोय गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या स्तराची टीका केली. त्यावर सुद्धा अजित पवार बोलले. “कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये.प्रत्येकाने बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. अरे ला का रे करणं सगळ्यांनाच येतं. सगळ्यांना सगळ्या प्रकारची भाषा येते. ती आपली संस्कृती, परंपरा नाही. ती आपल्या वडिलधाऱ्यांची शिकवण नाही. आपण शिव, शाहू,फुले, आंबेडकरांच नाव घेतो, त्यांनी त्या काळात सांगितलेले विचार यावर कितीतरी पुस्तक आली आहेत. त्यांचा इतिहास आपण वाचतो, सगळ्यांनी या बद्दल निश्चित काही बंधन पाळली पाहिजेत” असं अजित पवार म्हणाले.