आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथील मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा, अशी सूचना दिली आहे. विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.
राज ठाकरे हे सध्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हानगरचा दौरा करत आहे. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी राज ठाकरेंनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. अनेकांचा असा विश्वास आहे की निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात मतचोरी होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. यापुढे हे प्रकार रोखण्यासाठी आपण मतदार याद्यांवर काम केले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा, त्यात असलेल्या त्रुटी दूर करा. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची नोंद घ्या, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पक्षात एकीची भावनायावेळी राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी कठोर भूमिका घेतली. जे गेले ते आपले नाहीत असे राज ठाकरे म्हणाले. याद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पक्षात एकीची भावना निर्माण झाली आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यापूर्वी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो होते, ज्यावर “महाराष्ट्रात फक्त ठाकरेच…” असे लिहिले होते. तसेच आदेश मिळाले तर सोनं लुटायला वाजतगाजत जाऊ, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. यामुळे दसरा मेळाव्यात दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह संचारलाराज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. नेहमी सुस्त असलेल्या प्रशासनाला केवळ राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे जाग आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरेंनी शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी येथील स्वामी समर्थ चौक परिसरात मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी त्यांचे फटाके आणि ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या मेळाव्याला मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या आदेशांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकीसाठी पक्ष सज्ज झाल्याचे दिसत आहे.