Asia Cup 2025: टीम इंडियाचं Super 4 फेरीतील वेळापत्रक, फायनलमध्ये पोहचण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार?
Tv9 Marathi September 19, 2025 10:45 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत साखळी फेरीतील आपला सलग तिसरा सामना जिंकला. तर अफगाणिस्तानला पराभूत व्हावं लागलं. अफगाणिस्तानचा साखळी फेरीतील हा दुसरा पराभव ठरला. अफगाणिस्तानचं या पराभवसह स्पर्धेून पॅकअप झालं. टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या अफगाणिस्तानला आशिया कपमध्ये सुपर 4 पर्यंतही पोहचता आलं नाही. श्रीलंका-अफगाणिस्तान सामन्यानंतर सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं.

4 संघांचं पॅकअप

ए ग्रुपमधून यूएई आणि ओमान तर बी ग्रुपमधून हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या 4 संघांचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. तर टीम इंडिया (A1), पाकिस्तान(A2), श्रीलंका (B1) आणि बांगलादेश (B2) या 4 संघांनी सुपर 4 मध्ये धडक दिली. या निमित्ताने सुपर 4 मधील टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

टीम इंडियाने साखळी फेरीत यूएई आणि पाकिस्तानला पराभूत करत सुपर 4 फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने दोन्ही सामने विजयी आव्हानाचा पाठलाग करुन जिंकले. टीम इंडिया साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना 19 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सुपर 4 मोहिमेसाठी सज्ज होणार आहे.

टीम इंडिया आणि सुपर 4

प्रत्येक संघाला सुपर 4 फेरीत 3 सामने खेळायचे आहेत. त्यानुसार आपल्या गटातील संघाविरुद्ध 1 आणि प्रतिस्पर्धी गटातील 2 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 असे एकूण 3 सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे.

पुन्हा भारत-पाकिस्तान आमनासामना

टीम इंडियाने साखळी फेरीत 14 सप्टेंबरला पाकिस्तान संघावर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही संघ सपर 4 मध्ये आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करावं, अशी आशा चाहत्यांची असणार आहे. हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया सुपर 4 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात 24 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. तर भारताचा सुपर 4 मधील तिसरा आणि अंतिम सामना 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. सुपर 4 मधील सर्वाधिक सामने जिंकणारे 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे.

भारताच्या सुपर 4 फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक

21 सप्टेंबर, विरुद्ध पाकिस्तान, दुबई

24 सप्टेंबर, विरुद्ध बांगलादेश, दुबई

26 सप्टेंबर, विरुद्ध श्रीलंका, दुबई

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.