नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) उपबाजार पावसामुळे ओली झालेली कोथिंबीर खरेदीनंतर पिवळी पडत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे पन्नास हजार कोथिंबिरीच्या जुड्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोडून द्याव्या लागल्या.
कोथिंबिरीच्या भांडवली खर्चासह, काढणी मजुरी, वाहतूक आदींसाठी शेतकऱ्यांनी केलेला सुमारे वीस लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. मागील तीन दिवसांपासून हीच परिस्थिती येथील उपबाजारात दिसून येत आहे.
नारायणगाव परिसरात मागील तीन दिवसापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोथिंबीर ओली झाल्यास जुडी बांधल्यानंतर चार ते पाच तासात पिवळी पडून सडण्याची प्रक्रियासुरू आहे.
पावसामुळे काळ्या सुपीक जमिनीत पाणी साचले आहे. त्यामुळे कोथिंबीर,मेथी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हलक्या व मुरमाड जमिनीतील कोथिंबीर पिकाचे तुलनेत कमी नुकसान झाले आहे.