आंबोली (ता. चिमूर) : शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवार (ता. १८) आंबोली गावाजवळील लावारी येथे घडली. मृत महिलेचे नाव विद्या कैलास मसराम (वय ४२) असे आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाने ठाण मांडले होते. आज एका महिलेचा बळी घेतला.लावारी येथील विद्या कैलास मसराम या पतीसोबत धानाला खत टाकण्यासाठी बैलबंडीने गेल्या. बैलबंडी गावात नेण्यासाठी पती गावाकडे निघाला.
त्याचदरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने धानाचे निंदन करीत असलेल्या विद्या मसराम यांच्यावर हल्ला केला. त्यांना ठार करीत गावातील तलावाच्या परिसरापर्यंत ओढत आणले. पती बैलबंडी गावात नेऊन शेतावर पोहोचला. मात्र, त्यांना विद्या शेतावर दिसली नाही. त्याने शोधाशोध सुरू केली.
काही अंतरावर त्यांना रक्ताने माखलेला विद्याचा रुमाल दिसला. त्याच मार्गाने तो पुढे गेला. तेव्हा त्याला विद्या मृतावस्थेत दिसली. त्याने आरडाओरड सुरू केली. परिसरातील शेतकरी, मजूर गोळा झाले. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
Nagpur News: शेती कसणाऱ्या महिलेसह मुलाचा वीज कोसळून मृत्यू; धापेवाड्यातील घटना, मदतनीस महिलाही दगावलीवनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताच्या कुटुंबीयाला तातडीने पन्नास हजारांची मदत आणि दहा लाखांचा धनादेश देण्यात आला. उर्वरित पंधरा लाख रुपये वनविभागाच्या प्रस्तावित नियोजनानुसार देण्यात येईल. लोकांच्या मागणीनुसार वाघाला जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊरकर यांनी दिले.