आशिया कप स्पर्धा ही भारत पाकिस्तान सामन्यामुळे खऱ्या अर्थाने गाजते. कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी समोर आले की क्रिकेटला युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. पण पहलगाम हल्ल्यानंतर स्थिती काही वेगळी पाहायला मिळत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तान प्रति द्वेष आहे. कारण त्यांनी केलेली कृती माफ करण्यासारखी नाही. निष्पाप नागरिकांना बळी घेतल्यानंतर ही अजूनही मनात धगधगत आहे. अशीच भावना भारतीय क्रिकेटपटूंच्या मनात आहे. त्याचे पडसाद भारत पाकिस्तान सामन्यात दिसून आले. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानसोबत हँडशेक करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत आपल्या भावना मांडल्या. यानंतर क्रिकेट विश्वात राजकारण तापलं. पाकिस्तानच्या हे प्रकरण चांगलं जिव्हारी लागलं. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली ती वेगळी.. त्यामुळे पाकिस्तानने बोंबा मारण्यास सुरुवात केली. पण बोंबा मारून काही एक उपयोग झाला नाही. युएईविरुद्धचा मुकाट्याने खेळण्याची वेळ आली. असं असताना आशियाई क्रिकेट परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर स्पर्धेत प्रोटोकॉलचं उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. असं असताना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसीसीने पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्न विचारू नये असा आदेश काढला आहे. भारत पाकिस्तान सामन्यात प्रकरण शांत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मागच्या रविवारी हँडशेक प्रकरणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यामुळे एसीसीने असा निर्णय घेत पत्रकारांना संभ्रमात टाकलं आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कुलदीप यादव पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. तेव्हा एसीसीच्या मिडिया अधिकाऱ्यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितलं की, राजकीय प्रश्न विचारू नका.
एसीसीचा मिडिया विभाग या वादानंतर चौकशीच्या फेऱ्यात आला आहे. कारण युएईचा कर्णधार मुहम्मद वसीमला पाकिस्तानचा संघ मैदानात उशिरा आल्याने वारंवार प्रश्न विचारले गेले होते. त्यामुळे स्थिती आणखी नाजूक झाली होती. इतकंच काय तर आयसीसीच्या एका वरिष्ठ सदस्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पाकिस्तान संघाने सराव शिबिरात भाग घेतला होता. मग संघाकडून अनिवार्य असलेल्या पत्रकार परिषदेला कोण का सामोरं गेलं नाही. पाकिस्तान युएई सामन्यापूर्वी ही पत्रकार परिषद होणार होती.