ऐशी आणि नव्वदच्या दशकात एखाद्या चाहत्याने अभिनेत्रीला अवाजवी त्रास दिल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. कधी सेलिब्रिटीच्या घराबाहेर सतत पहारा देणं किंवा त्यांचा पाठलाग करणं हे अनेकदा होत असतं. परंतु आजच्या काळातही एका अभिनेत्रीसोबत अशा घटना घडल्या आहेत. तिला चाहत्याने चक्क रक्ताने लिहिलेलं पत्रच पाठवलं होतं. तर काहींनी तिच्या फोटोशी लग्न केलं.
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अमिषा पटेल आहे. या पहिल्यावहिल्या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिषा तिच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
“असंख्य चाहते माझा फोटो मंदिर किंवा चर्चमध्ये घेऊन जायचे आणि माझ्याशी लग्न करायचे. मला अनेकांची पत्रं मिळाली होती. ज्यामध्ये हार घातलेले आणि सिंदूर लावलेले माझे फोटो होते. तू माझी आहेस, असं त्यावर लिहिलेलं असायचं”, असा खुलासा अमिषाने केला.
एका चाहत्याने अमिषाला रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं. ‘तू बॉबी देओल आणि सनी देओल यांच्यासोबत कसं काम करू शकतेस? तू माझी आहेस’, असं त्याने पत्रात लिहिलं होतं. इतकंच नाही तर काही लोक गावातून तिचा पाठलाग करण्यासाठी आले होते. तिची एक झलक पाहण्यासाठी ते तिच्या घराबाहेर प्रतीक्षा करायचे.
यावेळी अमिषाने ‘कहो ना प्यार है’मधील गाण्याच्या शूटिंगचा किस्साही सांगितला. “आम्ही थायलंडमधील क्राबी इथल्या एका बेटावर शूटिंग करत होतो. तेव्हा तिथलं तापमान 40 अंश सेल्सिअस होतं. तिथे शौचालये नव्हती, मेकअप रुम नव्हतं, व्हॅन किंवा फूड स्टॉल्स नव्हते. आम्ही तासनतास उपाशी राहायचो.”