आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान संघ आणि क्रिकेट बोर्डाकडून नाटकी सुरु आहेत. कधी हँडशेकवरून, तर कधी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या प्रकरणावरून वाद उकरून काढत आहेत. इतकंच काय तर युएईविरुद्ध सामना खेळणार नाही म्हणून नाटकी केली ती अंगलट आली. शेवटी सामना खेळण्यासाठी मान खाली घालून मैदानात आले. हा सामना एक तास उशिराने सुरू झाला. वारंवार तोंडघशी पडूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंना काही अक्कल येत नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डान ब्लेमगेम सुरु केला आहे. खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्रात (PMOA) व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी सामनाधिकाऱ्यांवर बिल फाडलं आहे. या भागात केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगवर आयसीसीने नाराजी व्यक्त केली होती. तसेच पीसीबीला मेल पाठवून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर आता पीसीबीने हात झटकत कारण नसताना या प्रकरणात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना ओढलं आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी 17 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्रात (पीएमओए) नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल पीसीबीला एक कडक ईमेल पाठवला होता. पीएमओए क्षेत्रात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे ही एक गंभीर बाब आहे आणि नियमांचे उल्लंघन आहे, असं म्हंटलं होतं. आयसीसीने मागिलेल्या स्पष्टीकरणावर पीसीबीने सांगितलं की, संघाच्या मिडिया मॅनेजरला पीएमओएमध्ये प्रवेश होता. तसेच सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांची उपस्थिती नियमांचं उल्लंघन नव्हतं. जर नियमांचं उल्लंघन झालं असेल तर आयसीसीने सामनाधिकाऱ्यांना विचारायला हवं. कारण ही बाब भ्रष्टाचारविरोधी युनिट अधिकाऱ्यांना कळवली आहे का?
रिपोर्टनुसार, पीसीबीने सामनाधिकारी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट , पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आणि प्रशिक्षक माइक हेसन यांच्यातील संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करण्याचा आग्रह धरला होता. तसं झालं नाही तर सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पण सामना रद्द होऊ नये यासाठी पीसीबीला तसं करण्याची परवानगी दिली गेली. पीसीबीला बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर शेअर करायचं होतं.तसंच त्यांनी केले. त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आहे.