पारगाव येथील शाळेत चिमुकल्यांनी साकारली परसबाग
esakal September 19, 2025 06:45 PM

खुटबाव, ता. १८ : पारगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन गुंठे क्षेत्रामध्ये सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. ही बाग आता बहरली असून पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. या बागेमध्ये टोमॅटो, पालक, कोथंबीर, वांगी, भोपळा, मिरची, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या तरकारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही तरकारी शालेय पोषण आहाराच्या भाज्यांसाठी वापरली जाते.
शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशाल ताकवणे यांच्या संकल्पनेतून ही परसबाग साकारण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तरकारी पिकांची लागवड केली. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला काटे, भरत शिंदे, संतोष कांबळे, आनंद नागवडे, शहाजी गिरे, संगीता शिंदे, छगन खळदकर, आशा देशमुख, अनिता खेडकर, दीक्षा घोंगडे आदी शिक्षकांचे या उपक्रमावर विशेष लक्ष असते. या बागेमुळे विद्यार्थ्यांना शेती आणि सेंद्रिय पिकांबद्दल लहान वयातच माहिती मिळत आहे.
पारगाव येथील ही जिल्हा परिषद केंद्र शाळा दौंड तालुक्यातील पहिली ते चौथीपर्यंत सर्वाधिक ३१५ इतकी पटसंख्या असणारी एकमेव शाळा आहे. पारगाव व परिसरातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश या शाळेत घेण्यासाठी आग्रही असतात. अनेक सधन पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत न पाठवता या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे.

लोकसहभाग हे पारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशाचे गमक आहे. प्रत्येक शनिवारी लोकसहभागातून शालेय विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थ बनवला जातो. आगामी वर्षभरात शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीवर काम करणार आहे.
- चंद्रकला काटे, मुख्याध्यापिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.