Pune News : महाराष्ट्रातील कला केंद्रांना डान्स बार होण्यापासून वाचवण्याची मागणी
esakal September 19, 2025 11:45 PM

पुणे : महाराष्ट्रात जवळपास ८० लोककला केंद्रे आहेत. त्यापैकी निम्म्या कला केंद्रांमध्ये पारंपरिक वाद्यांऐवजी ‘डीजे’चा वापर करून अश्लील नृत्याला प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच काही ठिकाणी गैरप्रकारही होत आहेत. त्यामुळे खऱ्या लोककलावंतांची बदनामी होत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

थोडक्यात काही कलाकेंद्रे छुप्या पद्धतीने ‘मिनी डान्स बार’ होऊ पाहत असून, सुरू असलेल्या गैरप्रकारांवर बंदी आणावी, अशी मागणी राज्यस्तरीय अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटना व अखिल महाराष्ट्र तमाशा थिएटर मालक असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

Ganpati Festival 2025 : पुण्यात शिवमुद्रा पथकाच्या 'कल्लोळ' सोहळ्यात ढोल-ताशांचा जल्लोष

महाराष्ट्र तमाशा थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, महाराष्ट्र तमाशा कलावंतांचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, सुरेखा पवार उपस्थित होते. लाखे म्हणाले, ‘‘राज्यात संगीतबारीची जी कलाकेंद्रे आहेत, त्या केंद्रांत पारंपरिक वाद्यांचा वापर करून नृत्यकला सादर केली जाते.

पारंपरिक कला म्हणून अनेक पिढ्यांनी ही कला जोपासली आहे. भातू कोल्हाटी, कोल्हाटी आणि कळवात यांनी पारंपरिक लावणी ही कला जोपासली. परंतु गेल्या काही दिवसांपासून सांस्कृतिक केंद्रांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याने सरसकट सर्वच कलाकेंद्रे बदनाम होत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.