डोंबिवलीकरांची लोकल प्रतीक्षा कायम
esakal September 20, 2025 01:45 AM

डोंबिवलीकरांची लोकल प्रतीक्षा कायम
उलट मार्गिकेतील प्रवाशांमुळे गर्दी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : सकाळच्या वेळी डोंबिवली रेल्वेस्थानकातून लोकल पकडणे म्हणजे दिव्यच असते. त्यामुळे डोंबिवलीतील नोकरदार वर्ग हक्काच्या डोंबिवली लोकलची वाट पाहत असतो; मात्र डोबिवली स्थानकातून ७.४७, ८.१४ आणि ८.४१ ची लोकल असली तरी डोंबिवलीकर रेल्वे प्रवासीच प्रतिक्षेत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. मुंब्रा, दिवा, कोपर येथून प्रवासी उलट दिशेने प्रवास करुन लोकलमध्ये बसण्यासाठी सीट पकडत आहेत. त्यामुळे डोंबिवली स्थानकात येण्याआधीच लोकल इतर स्थानकातील प्रवाशांनी गच्च भरलेली असते. याविषयी कायमचा तोडगा काढण्याची मागणी ३०० हून अधिक महिला प्रवाशांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंब्रा, दिवा, कोपर या स्थानकांवरून उलट दिशेने प्रवास करणारे प्रवासी आधीच लोकलमध्ये जागा घेऊन बसतात. त्यामुळे डोंबिवली स्थानकात येणाऱ्या स्थानिक प्रवाशांना तर जागा मिळणे कठीण होते. खासकरून महिलांना या गर्दीत अधिक त्रास सहन करावा लागतो. उलट मार्गिकेतील महिला प्रवाशांनी तिन्ही महिला राखीव डब्बे भरलेले असतात, ज्यामुळे स्थानिक महिलांना जागा मिळणे अजूनच कठीण होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

डोंबिवली हे मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक गर्दीचे स्थानक असून, दररोज लाखो प्रवासी येथे प्रवास करतात. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे १५ डब्यांच्या लोकल्स सुरू करण्याची मागणी होत आहे; मात्र अद्याप यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. तर कर्जत, कसारा, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा येथून येणाऱ्या लोकल आधीच गर्दीने भरलेल्या असत्या स्थानिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नाही. कल्याणहून सुटणाऱ्या लोकल्सची संख्या कमी आणि वेळा अव्यवस्थित असल्यामुळेही डोंबिवलीकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कारशेडमधून गाडी सोडण्याची मागणी
डोंबिवली लोकलमध्ये प्रवासी सुस्थितीत उभे राहण्यासाठी जागा मिळावी, यासाठी लोकलमध्ये प्रवास करणे पसंतीचे असले तरी उलट मार्गिकेतील प्रवाशांमुळे हेही शक्य होत नाही. त्यामुळे डोंबिवली स्थानकावर नोकरी करणाऱ्या महिलांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही समस्या मांडली आहे.पूर्वी कल्याण स्थानकातून सकाळी सुटणाऱ्या ७.५६ वाजता लोकलमध्ये उलट मार्गिकेतील प्रवाशांचा त्रास जास्त होता, त्यावर तक्रारींनंतर कल्याण लोकल कारशेडमधून लोकल सोडण्यास सुरुवात झाली आणि उलट प्रवाशांचा त्रास कमी झाला. त्याचप्रमाणे डोंबिवली लोकल कारशेडमधून लोकल सोडण्याची विनंतीही या महिलांनी केली आहे.

रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. सकाळच्या वेळेतील डोंबिवली लोकलमधील काही डब्बे उलट मार्गिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी निश्चित करावेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना डब्यात बसण्यास जागा मिळेल. यासाठी आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी पुढाकार घ्यायला हवा.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.