लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ
esakal September 20, 2025 03:45 AM

लातूरमध्ये किरकोळ कारणावरून मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. मध्यरात्री अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करत तरुण आणि तरुणीला चाकूने भोसकलं. यात तरुणाचा मृत्यू झालाय, तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला सोलापूरहून तरुण आणि तरुणी आले होते. त्यांच्यावर मध्यरात्री पाच नंबर चौकाकडून औसाला जाणाऱ्या बायपास रोडवर हल्ला करण्यात आला. गाडीला कट का मारला यावरून हा हल्ला झाल्याची माहिती समजतो.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

हत्या झालेल्या तरुणाचं नाव अनमोल केवटे असं आहे तर त्याच्यासोबतच्या तरुणीचं नाव सोनाली भोसले आहे. दोघांवर अज्ञातांनी मध्यरात्री चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनमोल केवटेचा मृत्यू झाला. तर सोनाली गंभीर जखमी झाली आहे.

सोनाली भोसले हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येतेय. त्याच्यावर खंडणीसह इतर पाच गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.

पोलिसांनी हत्या प्रकरणी शुभम नावाच्या आरोपीला अटक केलीय. अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर चाकूने वार करण्यात आले होते. यात घाव वर्मी बसल्यानं अनमोलचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची मैत्रीण सोनालीवर आरोपीने छातीवर आणि पाठीवर वार केले आहेत. तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येतेय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.