- rat१९p५.JPG-
P25N92605
रत्नागिरी ः तालुक्यातील वेतोशी येथे दापोली कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कृषिरत्न गटाच्या विद्यार्थी ग्रामस्थांना पशुसंवर्धनाचे प्रात्यक्षिक दाखवताना.
पशुसंवर्धन तंत्रज्ञानावर आधारित वेतोशीत प्रात्यक्षिकं
कृषिरत्न गटाचे विद्यार्थी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ ः वेतोशी येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील कृषी विज्ञान पदवीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आधुनिक पशुसंवर्धन तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपुढे सादर केली. कृषिरत्न गटाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.
वेतोशी येथे सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांमध्ये कृषिरत्न गटाने प्रथम मुरघास तयार करण्याची प्रक्रिया दाखवली. त्यांनी हिरवा चारा कापून हवाबंद खड्ड्यांमध्ये दाबून भरण्याचे तंत्र समजावून सांगितले. यामुळे चारा किण्वन प्रक्रियेतून जातो आणि वर्षभर पौष्टिक खाद्य म्हणून उपलब्ध राहतो. त्यानंतर, पेंढ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, हे दाखवून दिले. पेंढा पचायला कठीण असतो कारण, त्यात लिग्निनचे प्रमाण जास्त असते. युरियाचे द्रावण वापरून पेंढ्यावर प्रक्रिया केल्याने ते पचायला सोपे होते आणि त्यात प्रथिनांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे जनावरांसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. दूधपूरकचा वापर शेवटच्या प्रात्यक्षिकात दाखवण्यात आला तसेच दूधपूरक वापरण्याचे फायदे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. हे एक खास तयार केलेले खाद्य, वासरांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असते. याचा मुख्य फायदा म्हणजे शेतकरी वासरांना दूध पाजण्याऐवजी ते बाजारात विकू शकतात, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
चौकट
नफा मिळवण्याचा व्यावहारिक मार्ग
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायातून अधिक नफा मिळवण्याचे व्यावहारिक मार्ग दाखवला आहे. ‘कृषिरत्न’ गटाने सादर केलेली ही प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, शेतकऱ्यांनी पशुधनाचे आरोग्य सुधारून आर्थिक फायदा मिळवण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग शिकवले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.