मालेगाव कॅम्प: शहर व परिसरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सोमवार (ता. २२)पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पूजेच्या साहित्य सामग्रीसह घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे.
सार्वजनिक मंडळातर्फे घटस्थापनेसाठी सजावटीसह इतर बाबीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. घटस्थापना आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने महिलांची घरातील स्वच्छतेत भांडे, घर, गोधडी, काना कोपरा स्वच्छ करण्याची लगबग सुरू आहे. महिलांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दगडी दिवा, डालकी, बोळके, ओटी, नारळ, वस्त्र,वात, देवीचा फोटो, हवन कुंड आदी वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांसह, मंडळातील कार्यकर्ते यांची बाजारपेठेत लगबग सुरू झालेली पहायला मिळत आहे. पितृ पक्ष संपताच नवरात्र उत्सस्वाची धामधूम शहरासह ग्रामीण भागात सुरू होणार आहे.
चक्रपूजेची तयारी
कसमादेत नवरात्र उत्सवात पाचव्या माळेपासून चक्रपुजा मोठ्या उत्सवात केली जाते. चक्रपुजेसाठी साहित्य खरेदीत हवन कुंड,देव पळ काडी,मोहळ,नारळ,कापूर आदीच्या खरेदीला नवरात्र उत्सव सुरू होताच वेग येतो. मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवताना दिसत आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी मूर्तींची मागणी लक्षात घेता कारखान्यात दुर्गा देवी, महालक्ष्मी, सप्तशृंगी देवी, अंबाबाई, रेणुका देवी, तुळजाभवानी माता अशा विविध मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. छोट्या मूर्तींची किंमत प्रती नग पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत तर मोठ्या मूर्तींची किंमत पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत आहेत.
साहित्याचे दर... रुपयांत
दगडी दिवा- २०० ते २५०, बोळके- २५, डालकी- २०, पूजा साहित्य- ३०, नारळ- ३०, ओटी- ४०, रंगीत वस्त्र- २५, वात- १०, देवीचे छायाचित्र- ६० ते ९०, हिरवी साडी- १६०, हवन कुंड- १०० ते १५०.
Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणारनवरात्रोत्सवासाठी लागणारे साहित्य बाजारात सज्ज झाले आहे. पूजेच्या वस्तूंचे दर काही प्रमाणात वाढले. घटस्थापना, पूजा साहित्य व देवीच्या मूर्ती खरेदीला तीन - चार दिवसांत वेग येईल. मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.
- रामदास बोरसे, मूर्तिकार, मालेगाव