आशिया कप स्पर्धेत संजू सॅमसनला ओमानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मागच्या दोन सामन्यात त्याच्या वाटेला फलंदाजी आली नव्हती. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करण्याशिवाय पर्याय नव्हता. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव प्रयोग करण्याच्या मनस्थितीत होता. यासाठी त्याने संघात दोन बदल केले होते. तसेच फलंदाजीच्या क्रमातही बदल करण्यात आला होता. संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. तसेच सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरलाच नाही. संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली खरी.. पण त्या खेळीबाबत क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्याने कधीच इतक्या धीम्या गतीने फलंदाजी केली नव्हती. संजू सॅमसनने 45 चेंडूत 56 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 124.44 चा होता. या खेळीत त्याने सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळले.
संजू सॅमसन आशिया कप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी दरम्यान 3 चौकार आणि 3 षटाकर मारले. पण यात त्याने तीन षटकं वाया घालवली. म्हणजेच 18 चेंडूत एकही धाव काढली नाही. तर 30 धावा या फक्त चौकार आणि षटकारने काढल्या होत्या. या खेळीत अबू धाबीच्या संथ खेळपट्टीचा त्याला त्रास होत असल्याचं दिसून आलं. संजू सॅमसनच्या तुलनेत अभिषेक शर्मा, अक्षर पटेल आणि तिलक वर्मा हे उजवे ठरले. अभिषेक शर्माने 253 च्या स्ट्राईक रेटने 38, अक्षर पटेलने 200 च्या स्ट्राईक रेटने 26, तर तिलक वर्माने 161 च्या स्ट्राईक रेटने 29 धावा केल्या.
ओमानविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल फेल गेला. त्याला फक्त 5 धावा करण्यात यश आलं. तर हार्दिक पांड्या कमनशिबी निघाला. संजू सॅमसनने स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि धावचीत होत तंबूत परतवं लागलं. शिवम दुबेची जादूही चालली नाही. भारताकडून या सामन्यात 200 पार धावांची अपेक्षा होती. पण भारतीय संघाला ओमानने 188 धावांवर रोखलं. ओमानकडून शाह फैसलने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 23 धावा देत 2 गडी बाद केले. तर रामानंदीने 33 धावा देत 2 गडी बाद केले. आमिर कलीमनेही 2 गडी बाद केले.