नागपूर - जनतेशी अधिक संपर्क, पक्ष संघटना बळकट करणे, मार्गदर्शक संविधान, सरकार-पक्ष समन्वय, संतुलित विकासाची दृष्टी, भाजपशी आघाडी मजबूत करणे, पारदर्शक प्रशासन, महिला सक्षमीकरण, विद्यार्थी आणि युवकांसाठी पक्षाचे सविस्तर धोरण जाहीर करून ते राबवण्याचा संकल्प आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ‘नागपूर डिक्लेरेशन’ या नावाने घोषित करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपुरात घेण्यात आले. शिबिराला प्रमुख नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिबिराच्या समारोपाला ‘नागपूर डिक्लेरेशन’ या जाहीरनाम्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मंत्र्यांच्या नेतृत्वात दहा समित्या स्थापन करून वेगवेगळे विषय वाटून देण्यात आले होते.
त्यांच्याकडून नव्या योजना, धाडसी कल्पना, पक्षाचे धोरण व वाटचाल यावर लेखी मत मागवण्यात आली. हे सर्व एकत्रित करून पवार यांनी ‘नागपूर डिक्लेरेशन’ या नावाने पक्षाचे धोरण जाहीर केले. महत्त्वाकांक्षा ठेवा, बदलाशी जुळवून घ्या, जबाबदारी घ्या सोबतच संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्त बाळगा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन
समारोपीय भाषणात अजित पवार म्हणाले की, पुढील काळात प्रत्येक नेता कार्यकर्ता लोकांशी जोडला राहील. राष्ट्रवादी परिवार मीलन, महिला संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या भावना जाणून घेतल्या जातील. पक्ष आणि जनता यांच्या दुहेरी संवाद ठेवण्यासाठी दर तीन महिन्यांनी जनसंवादाचा कार्यक्रम घेतला जाईल.
माझ्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमदार जनतेचा दारात जाऊन थेट तक्रारी ऐकून घेतील. चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन दिले जाईल. यावेळी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, कर्जाची टक्केवारी, निधी वळवल्याच्या विरोधकांमार्फत होत असलेल्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.