सोलापूर : मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, १५ ऑक्टोबरपासून सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. याची तिकीट विक्री २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट असून, सोलापूरच्या प्रगतीच्या दृष्टीने ही सेवा असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर- मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरू करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. मुंबई आणि बंगळूर या दोन सेवा सुरू होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.
सोलापूरच्या विकासाला मिळेल चालना
सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळूरशी जोडणे ही काळाची गरज होती. या हवाई सेवेमुळे सोलापूरकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगार निर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा विश्वास आहे.
- मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक
लवकरच तिकीट विक्री
२५ ऑक्टोबरपासून मुंबई व बंगळूरसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. तिकीट विक्री सुरू करण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आमची मागणी सात दिवसांची होती, पण स्लॉट नसल्याने चार दिवस सेवा देण्यात येणार आहे.
- समंथाना राजा, व्यवस्थापक, स्टार इंडिया
विमान उड्डाणाचे वेळापत्रक...
(सोलापूर-मुंबई विमानसेवा)
सेवेचे दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार
प्रस्थान - दुपारी १२.५५ वाजता निघून मुंबईला २.५५ वाजता पोचेल.
(मुंबई-सोलापूर विमानसेवा)
सेवेचे दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार
प्रस्थान - दुपारी २.४५ वाजता निघून सोलापूरला ४ वाजता पोचेल.
--------------------------------------------
(सोलापूर-बंगळूर विमानसेवा)
सेवेचे दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार
प्रस्थान - सकाळी ११ वाजता निघून दुपारी १२.२० वाजता पोचेल.
(बंगळूर-सोलापूर विमानसेवा)
सेवेचे दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार
प्रस्थान - दुपारी ४.१५ वाजता निघून सायंकाळी ५.३० वाजता पोचेल.