'माया'च्या निधनाने पोलिस अधिकारीही हळहळले! जर्मन शेफर्ड जातीचे श्वान होते सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाचा आधार; बॉम्ब शोधण्यात माया होती एक्स्पर्ट
esakal September 20, 2025 05:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील जर्मन शेफर्ड जातीच्या माया या श्वानाचे शुक्रवारी (ता. १९) आजाराने निधन झाले. शासकीय इतमामात शहर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालयासमोरील मोकळ्या मैदानात मायावर अंत्यविधी केला. यावेळी हवेत फायरिंग करून तिला सलामी देण्यात आली.

सोलापूरच्या शहर पोलिसात १२ ऑक्टोबर २०१५ रोजी माया दाखल झाली होती. त्यानंतर तिचे हस्तक पोलिस हवालदार अमोल बांदल व सुधाकर जिडगीकर यांच्या देखरेखीखाली तिला पुण्यात स्फोटकांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करून माया ७ सप्टेंबर २०१६ पासून शहर पोलिसांच्या सेवेत दाखल झाली. बॉम्बशोधक व नाशक पथकासाठी माया मोठी आधार होती. शहरातील दैनंदिन गर्दीची ठिकाणे, मर्मस्थळे, बेवारस बॅगा, वाहनांची तपासणी, व्हीव्हीआयपींचे दौरे, बंदोबस्त, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारीचा बंदोबस्त, तुळजापूर येथील नवरात्रोत्सवातील बंदोबस्त, भीमा- कोरेगाव बंदोबस्त, नंदुरबार, नांदेड यातील व्हीव्हीआयपी बंदोबस्त अशा ठिकाणी मायाने पोलिसांना मोठी मदत केली होती.

शुक्रवारी मायाच्या निधनाची वार्ता समजताच शहर पोलिसांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. सौम्य स्वभाव व तल्लख बुद्धिमत्ता ही मायाची ओळख होती. बॉम्बशोधक व नाशक पथकातील ती प्रिय सदस्य होती. तिच्या अंत्यविधीसाठी पोलिस उपायुक्त गौहर हसन, डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, राखीव पोलिस निरीक्षक लक्ष्मण बारावकर, ‘बीडीडीएस’चे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक प्रताप डोंगरे आदी उपस्थित होते.

‘माया’च्या कार्याची आठवण...

  • १) ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सोलापुरातील मरिआई पोलिस चौकीच्या परिसरात एक संशयित बॅग सापडली होती. त्या बॅगेसंदर्भात मायाने पोलिसांना इंडिकेशन दिले आणि त्या बॅगेची पडताळणी केली. त्यात १८ नग नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर व दोन पेन्सिल सेल, तांब्याचे रील, माचिस अशा वस्तू होत्या.

  • २) भीमा-कोरेगाव येथील बंदोबस्तावेळी पार्किंगची पाहणी करताना त्या ठिकाणी देखील मायाने इंडिकेशन दिले. त्यावेळी तेथे स्मोकलेस बॉम्ब निदर्शनास आला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.