Navratra Utsav : चतुःशृंगी मंदिर देवस्थानच्या नवरात्र उत्सवास सोमवारपासून प्रारंभ; देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची खास व्यवस्था, सुरक्षिततेवर अधिक भर
esakal September 20, 2025 05:45 AM

पुणे - चतुःशृंगी मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये चतुःशृंगी देवस्थान मंदिर परिसरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवानिमित्त धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम, यात्रा व सीमोल्लंघनाच्या दिवशी पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे.

नवरात्र उत्सवाबाबत मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, किरण अनगळ, श्रीधर अनगळ, सुहास अनगळ, नरेंद्र अनगळ आदी उपस्थित होते. मंदिरामध्ये सोमवारी (ता. २२) रोजी सकाळी साडे आठ वाजता मंदिरात घटस्थापना होईल, त्यानंतर उत्सवास प्रारंभ होईल.

पुढील नऊ दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. ७२ भजनी मंडळांकडून मंदिरात भजन सादर होणार आहे. भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल, यादृष्टीने दर्शन रांगेची व्यवस्था व भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली असल्याची माहिती अनगळ यांनी दिली.

नवरात्र उत्सवाची वैशिष्ट्य़े

- घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवास सुरुवात

- दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात पारंपरिक यात्रा भरणार

-२ ऑक्टोबरला पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

- पालखी मिरवणुकीत कलाकारांच्या पथकाकडून होणार ढोल-ताशा वादन

- मंदिराच्या सभामंडपाचे ८० टक्के काम पूर्ण, उर्वरित काम होणार वर्षभरात पूर्ण

- निर्माल्याचे खत तयार करून देवळामागील डोंगरावरील झाडांना वापरणार

भाविकांसाठी केलेली व्यवस्था

- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानात विनामूल्य पार्किंग सुविधा

- पार्किंग ते मंदिर परिसरापर्यंत भाविकांना आणण्यासाठी गोल्फ कार्टची व्यवस्था

- भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निमलष्करी दल, पोलिस, गृहरक्षक दलाकडून बंदोबस्त, सीसीटीव्ही

- देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांसह कार्डीऍक रुग्णवाहिका

- आपत्ती व्यवस्थापन साहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.