सोनसाखळीच्या लालसेपोटी वृद्धाची हत्या
esakal September 21, 2025 04:45 AM

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : सोनसाखळीच्या लालसेपोटी एका सलून चालकाने ७५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना काशी मिरा भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलूनचालकाला अटक केली आहे.

मिरा रोडच्या गौरव गॅलेक्सी फेज-१ मध्ये राहणारे विठ्ठल बाबुराव तांबे हे १६ सप्टेंबरपासून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या मुलाने काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तांबे यांचा शोध घेत असताना पाेलिसांनी त्यांच्या घरापासून आजूबाजूच्या परिसरामधील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यावेळी १६ सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तांबे हे एमआयडीसी रस्त्यावरील सरस्वती इमारतीमध्ये असलेल्या सागर सलूनमध्ये शिरताना दिसून आले. त्यानंतर १७ सप्टेंबरला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दुसऱ्याला सलूनमधून हाताने ओढत, फरफटत बाहेर नेत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे सलूनचालक अशफाक इशाक शेख याच्यावरचा पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने तांबे यांची हत्या केल्याचे कबूल केले.

मृतदेह गटारामध्ये फेकला
सलूनमध्ये स्वच्छतागृहाची चौकशी करण्यासाठी तांबे गेले होते व त्याठिकाणी बराच वेळ बसून राहिले. त्यांच्या गळ्यात असलेली सोनसाखळी पाहून अशफाक शेख याच्या मनात लालसा निर्माण झाली. थोड्या वेळाने दुकानामध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे पाहून अशफाकने तांबे यांचे तोंड व नाक टॉवेलने दाबून, तसेच हाताने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेवून मृतदेह दुकानातच ठेवला. गुरुवारी (ता. १८) पहाटे रस्त्यावर कोणीही नसल्याची खात्री करून त्याने मृतदेह जवळच असलेल्या गटाराचे झाकण उघडून टाकून दिला, असे त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) रात्री मृतदेह गटारातून बाहेर काढला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.