शासनाच्या योजनांचा फायदा घ्या
आर. आर. पाटील ः कोंडगावमध्ये विधी साक्षरता शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः समाजातील तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. त्याची उन्नती व्हावी यासाठी शासन विविध योजना, सुविधा देत असते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते. लाभार्थ्यांनी या योजनांचा, सुविधांचा फायदा घ्यावा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव समूह ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्र. सरपंच श्रद्धा शेट्ये, ग्रामविकास अधिकारी प्रवीण माईन उपस्थित होते. सार्वजनिक सेवा व केंद्र, राज्य सरकारच्या योजना आणि नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीमुळे पीडित नागरिकांना विधी सेवा या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील म्हणाले, लोकांचे कल्याण व्हावे, जीवनमान सुधारावे त्यासाठी विविध योजना शासनामार्फत केल्या जात असतात. त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सर्व योजना आणि त्याचा लाभ उपेक्षित व्यक्तीला मिळावा, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.