ब्रुसेल्स : युरोपमधील काही प्रमुख विमानतळांवर ‘चेक-इन’ आणि बोर्डिंग प्रणालीवर काल रात्री उशीरा सायबर हल्ला झाला. त्यामुळे अनेक ठिकाणची विमान सेवा ठप्प झाली. परिणामी शेकडो उड्डाणांना उशीर झाला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, भारतीय विमान सेवेवर परिणाम झाला नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ब्रुसेल्स विमानतळाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले, की ब्रुसेल्ससह अनेक युरोपियन विमानतळांवर शुक्रवारी (ता.१९) रात्री चेक-इन आणि बोर्डिंग प्रणालीवर सायबर हल्ला झाला.
ऑनलाइन व्यवस्था बंद पडल्याने प्रवाशांचे ‘चेक-इन’ आणि ‘बोर्डिंग’ची कामे प्रत्यक्ष करावे लागल्याने विमानांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. या तांत्रिक समस्येमुळे विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.
बर्लिनच्या ब्रॅंडेनबर्ग विमानतळाचे अधिकारी म्हणाले की शुक्रवारी प्रवासी सेवा प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाला. यामुळे विमानतळ प्रशासनाने त्या प्रणालीशी जोडणी तात्पुरती बंद केली. तांत्रिक समस्येमुळे ‘चेक-इन’ आणि ‘बोर्डिंग’ सेवेवर परिणाम झाला. कॉलिन्स एरोस्पेस ही कंपनी जगातील अनेक विमानतळांवर विमान कंपन्यांना ही सेवा पुरविते. त्यात उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे विमान उड्डाणांना उशीर होऊ शकतो, असे युरोपमधील सर्वात व्यग्र लंडनच्या हिथ्रो विमानतळाने सांगितले.
Cyber Attack on European Airports : मोठी बातमी! युरोपमधील अनेक देशांच्या विमानतळांवर सायबर हल्ला गैरसोयीबद्दल दिलगिरीप्रवाशांनी उड्डाणाची वेळ तपासावी, असे सल्ला देत अनेक विमानतळांनी गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. ब्रुसेल्स, बर्लिन, हिथ्रो या प्रमुख विमानतळांसह काही ठिकाणच्या सेवेवर या हल्ल्याने परिणाम झाला. मात्र जर्मनीतील सर्वांत मोठे फ्रँकफर्ट विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरू होते.