सावर्डे-एड्स जनजागृती व्याख्यान
esakal September 23, 2025 06:45 AM

निकम माध्यमिक विद्यालयात
एड्स जनजागृती व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २२ः येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एड्स जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय कामथेच्या समुपदेशक जयश्री सुतार आणि त्यांच्या सहकारी अर्पिता कवडे या उपस्थित होत्या. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेतर्गत भारत देशात आणि राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्गत राज्यात गावपातळी, महाविद्यालयीन, हायस्कूलस्तरावर मोठ्या प्रमाणात एचआयव्ही जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
माध्यमिक विद्यालयातील ११वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना एचआयव्ही, मानसिक आरोग्य, किशोरवयीन मुलींच्या समस्या, अंमली पदार्थ जनजागृती, संगणक सर्चिंग यावर सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थीदशेत कोणत्या चुका होतात, त्या कशा टाळल्या जाऊ शकतात, एचआयव्ही होण्याची कारणे आणि तो कसा टाळला जाऊ शकतो, याची माहितीही दिली गेली. आपली मानसिकता निरोगी ठेवा तरच आपलं आयुष्य चांगल्याप्रकारे जगता येईल, असा मोलाचा संदेश या वेळी देण्यात आला. या व्याख्यानाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश गंगावणे यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.