म्हाडाच्या अर्ध्याहून अधिक दुकानांना गिऱ्हाईक मिळेना
ई-लिलावमध्ये ७७ दुकाने बोलीविना, म्हाडाला टेन्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : म्हाडाच्या मुंबई शहर आणि उपनगरातील दुकानांच्या खरेदीसाठी गिऱ्हाईकच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबई मंडळाने १४९ दुकानांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये केवळ ७२ दुकानांना इच्छुकांकडून बोली आली आहे, तर अर्ध्याहून अधिक म्हणजे जवळपास ७७ दुकानांसाठी कोणीच बोली लावलेली नाही. त्यामुळे न विकलेल्या दुकानांची कशी विक्री करावी, असा म्हाडासमोर प्रश्न उभा राहिला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव, मालवणी, कांदिवली, मागाठाणे, कुर्ला, मुलुंड, शीव आणि पवई येथील १४९ दुकानांच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये मागील ई-लिलावात विक्री न झालेल्या काही दुकानांसह नवीन दुकानांचा समावेश होता. त्यानुसार १४९ दुकानांसाठी ४५४ जणांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते. त्या आधारे या दुकानांच्या ई-लिलावाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रतीक्षा नगरमधील एका दुकानासाठी सर्वात कमी ३५ लाख रुपयांची तर कोपरी पवईतील एका दुकानासाठी सर्वाधिक म्हणजे २२ कोटी रुपयांची बोली लागली. एकूण दुकानांचा विचार करता केवळ ७२ दुकानांसाठी बोली लागली असून, त्याहून अधिक दुकाने बोलीशिवाय राहिली आहेत.
मालवणी, बिंबिसार नगरची दुकाने
– म्हाडाच्या ई-लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या दुकानांमध्ये मालवणी आणि बिंबिसार नगरातील दुकानांचा समावेश असल्याचे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ही दुकाने आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने विकावी लागणार आहेत, मात्र म्हाडा प्राधिकरणाच्या मंजुरीनेच सदरचा निर्णय होऊ शकणार आहे.
– कोपरी पवई येथील एका दुकानाची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये एवढी होती, मात्र त्यासाठी तब्बल २२ कोटी रुपयांची बोली लावली होती. दरम्यान, अडीच कोटी रुपयांची बोली लावायची होती, नजरचुकीने २२ कोटी रुपयांची बोली लागल्याचे संबंधित बोलीधारकाने स्पष्ट करत माघार घेतली आहे. त्यामुळे सदर दुकान आता कोण घेणार, याकडे लक्ष लागले आहे.